लंकेविरुद्ध विजयी सलामी
लखनौ येथील पहिली टी-20 : भारतीय संघाचा 62 धावांनी एकतर्फी विजय, टी-20 क्रिकेटमधील सलग दहावा विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी
वृत्तसंस्था /लखनौ
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनने कारकिर्दीतील सर्वोत्तम 56 चेंडूत 89 धावांची आतषबाजी केल्यानंतर भारताने पाहुण्या श्रीलंकन संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात 62 धावांनी एकतर्फी फडशा पाडला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 4 बाद 199 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात लंकेला 20 षटकात 6 बाद 137 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना लंकेची 7 षटकात 3 बाद 36 अशी दैना उडाली आणि यानंतर ते यातून अजिबात सावरु शकले नाहीत. असलंका 53 धावांवर नाबाद राहिला असला तरी त्याचे प्रयत्न एकाकी ठरले. भारताकडून भुवनेश्वरने 9 धावात 2 तर वेंकटेश अय्यरने 36 धावात 2 बळी घेतले. याशिवाय, चहल व जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उभय संघातील दुसरी टी-20 उद्या (शनिवार दि. 26) धरमशाला येथे खेळवली जाईल.
भारताचा धावांचा डोंगर
तत्पूर्वी, इशान किशन (56 चेंडूत 89), श्रेयस अय्यर (28 चेंडूत नाबाद 57) व रोहित शर्मा (32 चेंडूत 44) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने या टी-20 सामन्यात निर्धारित 20 षटकात 2 बाद 199 धावांचा डोंगर रचला. रोहित व इशान यांनी 11.5 षटकात 111 धावांची शतकी भागीदारी साकारत उत्तम पायाभरणी केली तर तिसऱया स्थानावर उतरलेल्या श्रेयसने चौफेर फटकेबाजी करत त्यावर कळस चढवला.
यापूर्वी, विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत उत्तम प्रारंभाचे मोठय़ा डावात रुपांतर करण्यात अपयशी ठरलेल्या डावखुऱया इशान किशनने येथे मात्र धावांची जोरदार आतषबाजी केली. त्याने 10 चौकार व 3 उत्तुंग षटकार खेचत मल्टी मिलियन डॉलर आयपीएल टॅग सार्थ असल्याचा जणू दाखला दिला.
झारखंडच्या या 23 वर्षीय अव्वल फलंदाजाने कर्णधार रोहित शर्मासमवेत 111 धावांची शानदार सलामी दिली. लंकन संघाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर या जोडीने त्याचा पुरेपूर लाभ घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची उत्तम पिटाई केली. त्यानंतर अय्यरने तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरण्याची संधी मिळाल्यानंतर याचा उत्तम लाभ घेतला. त्याने 28 चेंडूत 5 चौकार व 2 उत्तुंग षटकार फटकावले.
प्रारंभी, दोन्ही सलामीवीरांमध्ये इशान किशन अधिक आक्रमक राहिला. त्याने चमिका करुणारत्नेच्या षटकात 3 चौकार फटकावत त्याची पूर्ण लाईन अँड लेंग्थ बिघडवून टाकली. त्याच्या या षटकात भारताने 15 धावा वसूल केल्या. लाहिरु कुमाराने वेगवान गोलंदाजीवर भर दिला. मात्र, इशानने त्यालाही प्रंटफुटवर पूल तर मिडविकेटच्या दिशेने फ्लिक करत फटकेबाजीचा सिलसिला सुरु केला.
नंतर डावखुरा स्पिनर प्रवीण जयविक्रमा हा इशानचे पुढील सावज ठरला. प्रारंभी शॉर्ट बॉलवर चौकार वसूल केल्यानंतर इशानने त्याला षटकारासाठी स्टँड्समध्ये भिरकावून दिले. भारताने पॉवर प्लेच्या षटकात 58 धावा फटकावल्या.
इशान उत्तम बहरात असताना रोहितने त्याला साथ देण्यावर अधिक भर दिला. रोहितच्या खेळीत स्लॉग स्वीपवरील चौकार व मिडविकेटवरील षटकार वैशिष्टय़पूर्ण ठरले. अर्धशतकापासून 6 धावांनी दूर असताना रोहित लाहिरुच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर इशान किशनला आणखी एक जीवदान लाभले. याचा लाभ घेत त्याने लाँगऑनकडे षटकार व त्यानंतर थर्ड मॅन, डीप मिडविकेटच्या दिशेने काही चौकार फटकावले. पुढे, श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीमुळे लंकन गोलंदाजांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले. भारतीय संघाने शेवटच्या 3 षटकात तब्बल 44 धावांची आतषबाजी केली.
धावफलक
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. कुमारा 44 (32 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), इशान किशन झे. लियानगे, गो. शनाका 89 (56 चेंडूत 10 चौकार, 3 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 57 (28 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 3 (4 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 2 बाद 199.
गडी बाद होण्याचा क्रम
1-111 (रोहित, 11.5), 2-155 (इशान, 16.6).
गोलंदाजी : दुष्मंता चमीरा 4-0-42-0, लाहिरु कुमारा 4-0-43-1, चमिका करुणारत्ने 4-0-46-0, प्रवीण जयविक्रमा 2-0-15-0, जेफ्री व्हॅन्डरसे 4-0-34-0, शनाका 2-0-19-1.
श्रीलंका : निसांका त्रि. गो. भुवनेश्वर 0 (1 चेंडू), कमिल झे. शर्मा, गो. भुवनेश्वर 13 (12 चेंडूत 2 चौकार), जनिथ झे. सॅमसन, गो. वेंकटेश 11 (17 चेंडू), असलंका नाबाद 53 (47 चेंडूत 5 चौकार), चंडिमल यष्टीचीत इशान, गो. जडेजा 10 (9 चेंडूत 1 चौकार), शनाका झे. भुवनेश्वर, गो. चहल 3 (6 चेंडू), करुणारत्ने झे. इशान, गो. वेंकटेश 21 (14 चेंडूत 2 चौकार), चमीरा नाबाद 24 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 2. 20 षटकात 6 बाद 137.
गडी बाद होण्याचा क्रम 1-0 (निसांका, 0.1), 2-15 (कमिल, 2.6), 3-36 (जनिथ, 6.6), 4.51 (चंडिमल, 9.2), 5-60 (दसुन, 10.5), 6-97 (करुणारत्ने, 15.4).
गोलंदाजी : भुवनेश्वर 2-0-9-2, बुमराह 3-0-19-0, हर्षल 2-0-10-0, चहल 3-0-11-1, वेंकटेश 3-0-36-2, जडेजा 4-0-28-1, दीपक हुडा 3-0-24-0.