रोहित-द्रविड पर्वाचा विजयी श्रीगणेशा!
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 5 गडी राखून एकतर्फी विजय, सुर्यकुमार-रोहितची उत्तम फटकेबाजी, अश्विन-भुवनेश्वरचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ जयपूर
सुर्यकुमार यादव-रोहितची फटकेबाजी आणि अश्विन-भुवनेश्वरच्या प्रत्येकी 2 बळींच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 5 गडी राखून मात दिली आणि या विजयासह राहुल द्रविड-रोहित यांच्या नव्या पर्वाचा विजयी श्रीगणेशा झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 164 धावांची मजल गाठल्यानंतर भारताने 19.4 षटकात 5 बाद 166 धावांसह विजयी लक्ष्य गाठले.
विजयासाठी 165 धावांचे आव्हान असताना केएल राहुल 15 धावांवर बाद झाला. पण, रोहितने 36 चेंडूत 48 तर सुर्यकुमारने 40 चेंडूत 62 धावा फटकावत संघाला ट्रकवर आणले. बोल्टने या दोन्ही फलंदाजांना बाद केले व त्यानंतर श्रेयस व वेंकटेश हे ‘अय्यर बंधू’ स्वस्तात गारद झाले. मात्र नंतर नाबाद 17 धावा फटकावणाऱया डावखुऱया रिषभ पंतने चौकार फटकावत विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. अक्षर पटेल एका धावेवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, मार्टिन गप्टील व मार्क चॅपमन यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर 6 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती. मार्टिन गप्टीलने अवघ्या 42 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 70 धावांची आतषबाजी केली तर तिसऱया स्थानी बढती मिळालेल्या युवा फलंदाज मार्क चॅपमनने 50 चेंडूत 63 धावांचे योगदान दिले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 6 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
या उभयतांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडचा संघ एकवेळ निर्धारित 20 षटकात 180 धावांचा टप्पा सहज गाठेल, अशीच चिन्हे होती. पण, रविचंद्रन अश्विनने एकाच षटकात 2 बळी घेत किवीज फलंदाजांना ब्रेक लावल्याने भारतासाठी परिस्थिती बऱयापैकी आटोक्यात राहिली. अश्विनने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 23 धावात 2 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले.
भुवनेश्वरचेही 2 बळी
मागील काही सामन्यात खराब फॉर्ममुळे झगडत असलेल्या अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या लढतीत काहीसा दिलासा मिळाला. त्याने 4 षटकात 24 धावात 2 बळी घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे चेंडू येथे बरेच स्विंग होत राहिले.
सायंकाळच्या सत्रात डय़ू फॅक्टर असेल, हे लक्षात घेत नूतन टी-20 कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या लढतीत भारताने अपेक्षेप्रमाणे वेंकटेश अय्यरला पदार्पणाची संधी दिली. न्यूझीलंडने यापूर्वी रविवारी टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये खेळलेल्या आपल्या मागील संघात येथे पहिल्या सामन्यासाठी चक्क 4 बदल केले. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार या बदलावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती संघव्यवस्थापनाने दिली.
युएईमधील टी-20 वर्ल्डकपमध्ये अजिबात सूर न सापडलेल्या भुवनेश्वर कुमारला या मालिकेच्या माध्यमातून आणखी एक संधी मिळाली असून ही संधी त्याने सार्थकी लावली. गप्टीलला काही उत्तम चेंडू टाकल्यानंतर त्याने डॅरेल मिशेलला एका अप्रतिम आऊटस्विंगरवर त्रिफळाचीत केले. न्यूझीलंडने 6 षटकांच्या पहिल्या पॉवर प्लेनंतर 1 बाद 41 पर्यंत मजल मारली होती. दीपक चहरला यातील एकाच षटकात 15 धावा मोजाव्या लागल्या.
हाँगकाँगचा जन्म असलेल्या चॅपमनने चहरच्या गोलंदाजीवर एरियल कव्हर ड्राईव्हचा षटकार खेचत आपल्या डावाला खणखणीत सुरुवात केली. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 1 बाद 65 धावा केल्या, इथवर परिस्थिती भारताच्या नियंत्रणात होती. नंतर 3 षटकातील झुंजार फलंदाजीमुळे चॅपमन व गप्टील यांनी अचानक भारतावर दडपण आणले.
चॅपमनने अक्षर पटेलच्या एका षटकात 1 चौकार व 1 षटकारासह 15 धावांची आतषबाजी केली. न्यूझीलंडतर्फे त्याने येथे पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. चॅपमन यापूर्वी हाँगकाँगकडून खेळलेलाआहे.
गप्टीलची घोडदौड कायम
अनुभवी गप्टील या लढतीत देखील उत्तम बहरात दिसून आला. त्याने सिराजच्या एका स्लोअर वनला लाँगऑफची दिशा दाखवत धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली.
नंतर अश्विनला 14 व्या षटकात आक्रमणाला आणले गेले आणि हा मास्टरस्ट्रोक ठरला. त्याने टॉसअप चेंडूवर चॅपमनचा त्रिफळा उडवला आणि याच षटकात ग्लेन फिलीप्सला कॅरम बॉलवर पायचीत करत किवीज संघाला आणखी एक धक्का दिला.
गप्टील मात्र थांबण्याच्या इराद्यात नव्हता. त्याचा सर्वोत्तम फटका 16 व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटकावला गेला. येथे गप्टीलने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत षटकार वसूल केला. गप्टीलचा धडाका पाहता न्यूझीलंडने 200 धावांचा माईलस्टोन सर केला असता तर त्यातही आश्चर्य
नव्हते. पण, भारताच्या सुदैवाने गप्टील डावातील 18 व्या षटकात डीपमधील श्रेयसकरवी झेलबाद झाला.
भारताने शेवटच्या 5 षटकात 41 धावा देत 3 बळी टिपले.
भारत-न्यूझीलंड यांच्या या मालिकेत 3 टी-20 व त्यानंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टील झे. श्रेयस, गो. दीपक चहर 70 (42 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), डॅरेल मिशेल गो. भुवनेश्वर 0 (1 चेंडू), मार्क चॅपमन त्रि. गो. अश्विन 63 (50 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), ग्लेन फिलीप्स पायचीत गो. अश्विन 0 (3 चेंडू), टीम सेफर्ट झे. यादव, गो. भुवनेश्वर 12 (11 चेंडूत 2 चौकार), रचिन रविंद्र त्रि. गो. सिराज 7 (8 चेंडूत 1 चौकार), मिशेल सॅन्टनर नाबाद 4 (4 चेंडू), टीम साऊदी नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 6 बाद 164.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (डॅरेल, 0.3), 2-110 (मार्क चॅपमन, 13.2), 3-110 (ग्लेन, 13.5), 4-150 (गप्टील, 17.2), 5-153 (टीम सेफर्ट 18.2), 6-162 (रचिन रविंद्र, 19.5).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 4-0-24-2, दीपक चहर 4-0-42-1, मोहम्मद सिराज 4-0-39-1, रविचंद्रन अश्विन 4-0-23-2, अक्षर पटेल 4-0-31-0.
भारत ः केएल राहुल झे. चॅपमन, गो. सॅन्टनर 15 (14 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रोहित शर्मा झे. रविंद्र, गो. बोल्ट 48 (36 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), सुर्यकुमार यादव त्रि. गो. बोल्ट 62 (40 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), रिषभ पंत नाबाद 17 (17 चेंडूत 2 चौकार), श्रेयस अय्यर झे. बोल्ट, गो. साऊदी 5 (8 चेंडू), वेंकटेश अय्यर झे. रविंद्र, गो. मिशेल 4 (2 चेंडूत 1 चौकार), अक्षर पटेल नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 14. एकूण 19.4 षटकात 5 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम
1-50 (केएल राहुल, 5.1), 2-109 (रोहित, 13.2), 3-144 (सुर्यकुमार, 16.4), 4-155 (श्रेयस, 18.6), 5-160 (वेंकटेश, 19.2).
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-40-1, बोल्ट 4-0-31-2, फर्ग्युसन 4-0-24-0, सॅन्टनर 4-0-19-1, ऍसल 3-0-34-0, डॅरेल मिशेल 0.4-0-11-1.
केन विल्यम्सननंतर काईल जेमिसनचीही टी-20 मालिकेतून माघार
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने भारताविरुद्ध या टी-20 मालिकेतून माघार घेतल्यानंतर तोच कित्ता जलद गोलंदाज काईल जेमिसनने देखील गिरवला. आगामी कसोटी मालिकेवर फोकस ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्याने जाहीर केले. भारत-न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या छोटेखानी मालिकेनंतर उभय संघात 2 कसोटी सामने देखील होणार आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व टी-20 मधील पूर्ण वेळ कर्णधार रोहित शर्मा यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच मालिका आहे. ‘केन विल्यम्सन व काईल जेमिसन यांचा मुख्य भर कसोटी मालिकेवर आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी टी-20 मालिकेतून माघार घेतली. संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे येथे केवळ एकाच मालिकेत खेळत आहेत’, असे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाले.