रोजगार निर्माते बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा!
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
सरकारतर्फे आयटी धोरण, स्टार्टअप अंतर्गत तरुणांसाठी विविध योजना, फायदे देण्यात येतात. तरुणांनी स्वतःला केवळ नोकरी शोधणारे म्हणून मर्यादित न ठेवता या योजनांचा लाभ घेऊन रोजगार निर्माते होण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या ’टेनिंग इंटर्नशिप आणि प्लेसमेंट सेल’ (टीआयपी) च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाटो पणजी येथे कला संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर त्यांच्यासमवेत शिक्षण सचिव रवी धवन, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, राज्य उच्च शिक्षण परिषद आणि टीआयपीचे समन्वयक नियान मार्शन, उद्योग प्रतिनिधी मिलिंद अणवेकर, स्वप्नील चक्रवर्ती, वंदना नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी, विद्यार्थ्यांची मानसिकता एका दिवसात बदलता येत नाही. त्यासाठी त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या दिवसापासूनच त्याची तयारी करावी लागते. यादृष्टीने उच्च शिक्षण संचालनालयाने उचललेली पावले महत्त्वाची आहेत. त्यांच्या क्रियाशीलतेमुळे गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत असून विद्यार्थी विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत, असे सांगितले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) अंतर्गत कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे एक उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी उच्च शिक्षण संचालनालयाने केपे, सांखळी आणि खांडोळा येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’इन्सपायर टू ऍस्पायर’ अंतर्गत जॉब प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. त्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने 60 विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व प्रशिक्षण दिले होते. त्यातील 30 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली.
लोलयेकर यांनी स्वागत केले. मार्शन यांनी अहवाल वाचन केले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन तर वंदना नाईक यांनी आभार मानले.
‘टीआयपी’स्थापनेमागचा उद्देश
विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करून भविष्यात त्यांना नोकरीची संधी मिळावी या उद्देशाने विविध उद्योगधंद्यात उतरण्यासाठी प्रशिक्षण देणे, त्यांच्या जॉब प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करणे या उद्देशाने ’टीआयपी’ स्थापन करण्यात आली आहे. या सेलचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून हा सेल इंडस्ट्री, महाविद्यालये आणि विद्यार्थी यांच्याशी समन्वय साधकाची भूमिका निभावणार आहे.
दरम्यान, संचालनालयाने सीएसआर उपक्रमांतर्गत आयबीएमद्वारे कौशल्य बांधणी कार्यक्रमाची आखणी केली आहे. सप्टेंबरअखेर हा उपक्रम सुरू होईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये प्रदान करण्यात येतील.