रेल्वे अपघातग्रस्तांना तत्काळ भरपाई
रेल्वे मंत्र्यांना पाडला नवा पायंडा, इंजिनातील दोषामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष
कोलकाता / वृत्तसंस्था
गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये बिकानेर-गुवाहाटी एक्स्पेसला झालेल्या आपघातातील मृतांची संख्या वाढून 9 झाली आहे. हा अपघात इंजिनातील दोषामुळे झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक तपासातून काढण्यात आला आहे. अपघातातील मृतांच्या तसेच जखमींच्या कुटुंबियांना तत्काळ भरपाई देण्यात आली असून हा नवीन पायंडा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाडला आहे.
गुरुवारी संध्याकाळी ही दुर्घटना पश्चिम बंगालमधील जालपाईगुडीनजीक गाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने घडली होती. त्वरित साहाय्यता कार्य सुरु करण्यात आल्याने घसरलेल्या डब्यांमध्ये अडकलेल्या अनेक जणांची सुटका करण्यात यश आले होते. अपघातात 9 प्रवाशांच्या मृत्यू झाला असून 57 जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
रेल्वेमंत्री अपघातस्थळी
अपघाताचे वृत्त कळताच रेल्वेमंत्री शुक्रवारी पहाटे दिल्लीहून अपघातस्थळी पोहचले. त्यांनी साहाय्यता कार्याची पाहणी केली. जखमींवर उपचार होत असलेल्या रुग्णालयांना भेटी देऊन त्यांनी त्यांची विचारपूस केली. नंतर पत्रकार आणि मिडियाशी संपर्क करुन या दुर्घटनेची सविस्तर माहितीही दिली.
इंजिनातील दोषामुळे अपघात
अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून चौकशीचा प्रारंभ गुरुवारी रात्रीच करण्यात आला होता. प्रथमदर्शनी तपासानुसार अपघात इंजिनातील दोषामुळे घडल्याचे दिसून आले आहे. मात्र, सविस्तर चौकशीनंतरच यावर प्रकाश पडणार आहे. या गाडीला 12 डबे असून 1 हजाराहून अधिक प्रवासी होते. प्रत्येक मृतामागे 5 लाख रुपये, प्रत्येक गंभीर जखमीमागे 1 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येक 25 हजार रुपयांची भरपाई घोषित करण्यात आली होती.