रेल्वेस्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला, 50 ठार
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात शुक्रवारी लोकांची गर्दी असलेल्या क्रैमेटोर्स्क रेल्वेस्थानकावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कमीत कमी 50 जण मारले गेले आहेत, तर सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्क भागात असलेल्या रेल्वेस्थानकावर हा हल्ला झाला आहे. याच भागात सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. स्थानकावर पोहोचलेले बहुतांश लोक सुरक्षितठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची प्रतीक्षा करत होते. सर्वसामान्य नागरिकांवर झालेल्या या हल्ल्यात स्वतःचा हात नसल्याचा दावा रशियाने केला आहे. तर अमेरिका आणि युरोपीय महासंघाने हल्ल्याची कठोर निंदा केली आहे. याचदरम्यान रशियाने युक्रेन युद्धात मोठे नुकसान झाल्याची बाब कबूल केली आहे.
झेलेंस्कींनी मागितली शस्त्रास्त्रs
बूचा नरसंहाराप्रकरणी रशियाला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणाऱया युक्रेनने युद्धविरामासाठी दोन्ही देश चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी पाश्चिमात्य देशांकडे रशियावर अधिक कठोर निर्बंध लादण्याची आणि लढण्यासाठी शस्त्रास्त्रs पुरविण्याची मागणी केली आहे.
क्लस्टरबॉम्बयुक्त क्षेपणास्त्र
क्लस्टर बॉम्ब वाहून नेणाऱया क्षेपणास्त्राच विस्फोट हवेत झाला आहे. यातून बाहेर पडलेल्या अनेक छोटय़ा बॉम्बनी मोठे नुकसान घडवून आणले असल्याची माहिती डोनेस्कचे गव्हर्नर पाव्लो किरिलेंको यांनी दिली आहे. क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी असली तरीही याच्याशी संबंधित करारावर रशियाने स्वाक्षरी केलेली नाही.
हल्ल्यावेळी 4 हजार लोक उपस्थित
क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी रेल्वेस्थानकात आणि बाहेर सुमारे 4 हजार लोक उपस्थित होते. क्षेपणास्त्र हल्ल्याने स्थानकावर चित्काराची स्थिती निर्माण केली आणि तेथे चेंगराचेंगरी सुरू झाली. मोठय़ा आवाजाच्या स्फोटासह तेथे आग लागल्याने अनेक जण होरपळून मृत्युमुखी पडले. स्थानकावर पोहोचलेल्यांमध्ये शहर सोडून जाणाऱया महिला, वृद्ध आणि मुलांचे प्रमाण अधिक होते. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये त्यांचीच संख्या अधिक आहे.
मृतांची संख्या वाढणार
अनेक जखमींचा मृत्यू रुग्णालयात झाला आहे, तर कित्येक जखमींची प्रकृती गंभीर आहे. स्थानकाच्या स्थितीची अनेक छायाचित्रे किरिलेंको यांनी इंटरनेटवर प्रसारित केली आहेत. स्थानकावरील हल्ल्यात वापरण्यात आलेले क्षेपणास्त्र रशियाचे नव्हते, अशा प्रकारचे क्षेपणास्त्र युक्रेनचे सैन्य वापरत असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
रशियाकडून नागरिक लक्ष्य
रेल्वेस्थानकावर युक्रेनचा एकही सैनिक नव्हता, तेथे असलेल्या नागरिकांवर रशियाच्या सैन्याने हल्ला केला असल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी फिनलंडच्या संसदेला संबोधित करताना काढले आहेत. क्रैमेटोर्स्क शहर डोनेस्क भागात मोडेत, डोनेस्कच्या एका हिस्स्यावर रशियाचे समर्थनप्राप्त बंडखोरांचा 2014 पासून कब्जा आहे. उर्वरित हिस्स्यावर कब्जा करण्यासाठी रशियाचे सैन्य सध्या लढत आहे. याच्या शेजारील लुहान्स्क प्रांतात रशियाने मोठय़ा प्रमाणावर ताबा मिळविला आहे. दोन्ही क्षेत्रांच्या भूभागांनाच डोनबास असे म्हटले जाते. युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. तर उत्तर हिस्स्यातून रशियाचे सैनिक पूर्णपणे मागे हटले आहेत. तेथे पुन्हा युक्रेनने नियंत्रण प्रस्थापित केले आहे.
650 मृतदेह हस्तगत
बूचा, बोरोडियांका, इरपिन आणि काही अन्य भागांमधून आतापर्यंत 650 नागरिकांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यातील 40 मृतदेह मुलांचे आहेत. हे मृतदेह अनेक आठवडे जुने असून सर्वांचा मृत्यू गोळय़ा लागल्याने झाल्याची माहिती युक्रेनच्या प्रॉसिक्यूटर जनरल इरयाना वेनेडिक्टोवा यांनी दिली आहे.
युरोपीय महासंघ अध्यक्षांचा दौरा
युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी युक्रेनच्या बूचा शहराचा दौरा केला आहे. बूचामध्ये आम्ही माणुसकी विखुरताना पाहिली आहे. बूचाच्या लोकांसोबत पूर्ण जग शोक करत आहे. आम्ही या महत्त्वपूर्ण लढाईत युक्रेनसोबत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाला मोठे नुकसान
सुमारे दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने पहिल्यांदाच आपल्या सैन्याला मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. परंतु मारले गेलेल्या सैनिकांची संख्या आणि नष्ट झालेल्या शस्त्रास्त्रांबद्दल रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने माहिती देणे टाळले आहे. तर आतापर्यंत 18 हजारांहून अधिक रशियाचे सैनिक ठार झाले असून 150 हून अधिक लढाऊ विमाने आणि सुमारे 700 रणगाडे नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा आहे.