रुहेलखंडमध्ये मुस्लीबहुल जागांवर कसोटी
मागील निवडणुकीत भाजप ठरला होता सरस
उत्तरप्रदेशात मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यावर राजकीय पक्षांच्या नजरा पश्चिम उत्तरप्रदेश आणि रुहेलखंडच्या मुस्लीमबहुल जागांवर केंद्रीत झाल्या आहेत. दुसऱया टप्प्यात 9 जिल्हे सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं आणि शाहजहांपूरच्या 55 जागांवर 586 उमेदवार मैदानात उतरले आहेत. येथे आज मतदान होणार आहे. मुस्लीमबहुल जागांमुळे दुसरा टप्पा भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या प्रचारसभेद्वारे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत.
याची प्रचिती सहारनपूरमध्ये 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत मिळाली. पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्ष स्वरुपात सहारनपूरच्या सभेत कर्नाटकमधील हिजाब वादाला उत्तरप्रदेशच्या निवडणुकीशी जोडले आहे. मुस्लीम महिलांकडून भाजपचे होणारे कौतुक पाहवले न गेल्याने असे वाद निर्माण केले जात असल्याचा त्यांचा युक्तिवाद होता.
55 पैकी 38 जागांवर विजय
दुसऱया टप्प्यात मुस्लीम मतदाराला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तरप्रदेश आणि रुहेलखंडच्या 55 जागांपैकी 38 जागांवर विजय मिळविला होता. तर 15 जागा समाजवादी पक्षाला मिळाल्या होत्या. तर 2 ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. बहुजन समाज पक्षाला एकाही जागेवर विजय मिळविला आला नव्हता.
मुस्लीम मतदार महत्त्वपूर्ण
दुसऱया टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं आणि शाहजहांपूरमध्ये मतदान होणार आहे. येथील मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्यानंतर जाट तसेच कुर्मी आणि लोधी मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. 2017 च्या निवडणुकीत सप आणि काँग्रेसची आघाडी झाली होती, याचा लाभही त्यांना मिळाला. होता. सपाचे 10 मुस्लीम उमेदवार मागील वेळी विजयी झाले होते.
राजकीय आघाडय़ांमध्ये बदल
2017 च्या निवडणुकीत ‘मित्र’ झालेले काँग्रेस आणि समाजवादी पक्ष 2022 च्या निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआतही काही सहकारी वेगळे आहेत. सप, बसप आणि काँग्रेस तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत. परंतु अखिलेश यादव यांनी जयंत चौधरींचा रालोद तसेच काका शिवपाल यादव यांच्या प्रसपसोबत आघाडी केली आहे.
55 जागा, 77 मुस्लीम उमेदवार
दुसऱया टप्प्यातील 55 मतदारसंघांमध्ये 77 मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. बसपने सर्वाधिक मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. बसपकडून दुसऱया टप्प्यात 23 मुस्लीम चेहऱयांना संधी देण्यात आली. तर काँग्रेसचे 21, सप-रालोद आघाडीचे 18 आणि ओवैसी यांच्या पक्षाचे 15 मुस्लीम उमेदवार रिंगणात आहेत.
मतविभागणी झाल्यास भाजपला लाभ
2017 मध्ये या 55 जागांपैकी 38 ठिकाणी भाजपने विजय मिळविला होता. पश्चिम उत्तरप्रदेश आणि रुहेलखंडमध्ये सप, काँग्रेस, बसप आणि एआयएमआयएमने 77 मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. या मुस्लीम उमेदवारांमुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत याचा थेट लाभ भाजपला होऊ शकतो.