राजस्थानसमोर आज फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्सचे आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आज शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्सशी भिडणार असून यावेळी लक्ष संघर्ष करणाऱ्या यशस्वी जैस्वालवर असेल. तो त्याचा फॉर्म बदलण्यास उत्सुक असेल. या आयपीएल हंगामात 1, 29 आणि 4 अशी निराशाजनक कामगिरी केलेल्या जस्वालने अंतर्गत वादाच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी देऊन गोव्याची वाट धरली आहे.
राजस्थानच्या कर्णधारपदी सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सवर निसटत्या फरकाने विजय मिळवूनही हंगामी कर्णधार रियान परागचे नेतृत्व प्रेरणा देऊ शकलेले नाही. रॉयल्सची फलंदाजी सॅमसनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असून शिमरॉन हेटमायर डावाच्या उत्तरार्धात वेग मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. तथापि, मोठी धावसंख्या उभारण्याच्या आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या बाबतीत जैस्वाल आणि ध्रुव जुरेलचा फॉर्म त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या प्रभावी नेतृत्वाखाली पंजाब किंग्सची जोरदार घोडदौड चालली आहे. अय्यरने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि दोन सामन्यांमध्ये आधीच 13 षटकार खेचले आहेत. प्रभावी क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीत बदल यासह त्याची रणनीती उठून दिसली आहे. यामध्ये फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलचा प्रभावी वापर समाविष्ट असून तो युजवेंद्र चहलपेक्षाही प्रभावी दिसलेला आहे. जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, वानिंदू हसरंगा आणि तुषार देशपांडेसह राजस्थानचा मारा हा मजबूत आहे, परंतु भयावह नाही. पंजाबच्या फलंदाजीचा विचार करता राजस्थानला सुरक्षित वाटण्यासाठी किमान 210 धावांची आवश्यकता असेल.
संघ : पंजाब किंग्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, पायला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, नेहल वधेरा, अझमतुल्लाह उमरझाई, एरोन हार्डी, मार्को जेनसेन, ग्लेन मॅक्सवेल, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंग, तुषार देशपांडे, फजलहक फाऊकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.