राजकारणातील सभ्यता
राजकारण हा गुन्हेगारीचा शेवटचा अड्डा असे म्हटले जाते आणि जरा उघडे डोळे ठेऊन आजूबाजूला बघितले की त्याची प्रचिती येते. गेल्या काही वर्षात मोठे उद्योग, व्यापारी, शेतकरी, दुकानदार अडचणीत दिसतात. पण लहान-मोठे नेते, पुढारी गडगंज होताना दिसत आहेत. नोकरीची पोस्ट मिळवायची म्हणून रात्रीचा दिवस करून आणि जनरल नॉलेजची पुस्तके पाठ करून वेडय़ासारखी राबणारी आणि निराश, नाराज होणारी मुले-मुली एकिकडे दिसत आहेत. तर नोकऱया गेल्या, पगार पूर्ण मिळत नाही, स्थलांतर करावे लागले असा कामगार वर्ग आणि अवकाळी, ढगफुटी, महापूर, गारपीट, लॉकडाऊन यामुळे संकटात भरडत असलेला शेतकरी दुसरीकडे दिसतो आहे. या काळात राजकारण हा तेजीचा धंदा झाला आहे. जातदांडगेपण, धनदांडगेपण आणि मतपेटी यांची सांगड घालत मंडळी पै-पाहुणे, नातेवाईक आणि मर्जीतील लोकांचे उखळ पांढरे करताना दिसत आहेत. सभ्यता, स्वच्छता, चारित्र्य, पावित्र्य हे शब्द सांगण्यापुरते आणि उच्चारण्यापुरते राहिले आहेत. बाकी धर की वरबड अशी पिपासू वृत्ती आहे. ओघानेच राजकारणातील मंडळी गब्बर होताना दिसत आहेत. आणि प्रामाणिक काम करणारे रोज नव्या अडचणीत येताना दिसत आहेत. कालपर्यंत ज्यांना अंगावर धड सदरा नव्हता, ज्यांचे शिक्षण नाही, वडील-आजोबा शेतमजूर होते ती माणसे आज महागडय़ा गाडय़ात बसून समाजसेवा करताना दिसत आहेत. लहान गावापासून वरपर्यंत हाच पॅटर्न आहे. त्याला कोणतेही गाव वा पक्ष अपवाद नाही. सर्वत्र तोडपाण्याचा आणि वसुलीचा गोरख धंदा तेजीत आहे. यामध्ये कुणा व्यक्तीला,पक्षाला वेगळे करणे योग्य होणार नाही आणि कुणा एक व्यक्तीला दोष देता येणार नाही. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि ती फोफवायला आपण सारे मतदार जबाबदार आहोत. आपण जसे पेरतो तसे पिक उगवणार हे सुस्पष्ट आहे. आपण बाभळीचे रोप लावले तर त्याला हापूस आंबे लागणार नाहीत हे सत्य आहे. तरीही आज जाणीवपूर्वक काटेरी झाडे लावली जात आहेत आणि एकमेकांवर हल्लाबोल करून चिखलफेक साधत मंडळी मालामाल होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे टोकाचे बोलतात. सभ्यता, संस्कृती, परंपरा, परिणाम यांच्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही. खोट बोल पण रेटून बोल असे अलीकडे सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना सांगत असतात आणि स्वतःही तसे वागत असतात. त्यातूनच मग वाद, आरोप, चिखलफेक, शिवीगाळ सुरू असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले व्यक्तव्य सर्वत्र चर्चेचे, टिकेचे व निंदेचे झाले आहे. ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे विधान नाना पटोले यांनी केले आणि त्यानंतर देशभर संताप उसळला. अनेकांनी संताप व्यक्त केला. नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी, त्याना अटक करावी अशी मागणी नितीन गडकरी यांच्यापासून अमृता फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांनी केली व करत आहेत. पण नाना पटोले व काँग्रेस नेतृत्वाला त्यांची खंत नाही वा फिकीरही नाही. वरपर्यंत असाच भरणा आहे. सावरकरांना माफीवीर म्हणणारे त्यांचे नेते आणि मी सावरकर नाही असे छाती काढून सांगणारे युवराज सर्वांना ज्ञात आहेत. ओघानेच या प्रकरणात शब्द मागे घेतले. दिलगिरी व्यक्त केली असे काही होईल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. नाना पटोलेंच्या मार्फत मी पंतप्रधान मोदींच्या बद्दल बोललो नाही स्थानिक गुंड मोदींबद्दल बोललो असे सांगितले जाते आहे. पण तेथे मोदी नावाचा कुणी गुंडच अस्तित्वात नाही. पंतप्रधानांबाबत असे वक्तव्य निषेधार्ह तर आहेच पण, अशा माणसांवर कायद्याने कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा प्रश्न अतितीव्र झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही महिन्यापूर्वी त्याची जाणीव करून दिली होती. त्यानंतर पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या गाडय़ांचा ताफा पुलावर अडवून ठेवला होता. आता त्याची चौकशी होते आहे. संशयाच्या पाली चुकचुकत असताना काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांचे ‘मी त्यांना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ हे विधान सहज, सोपे, टिकेपुरते म्हणता येणारे नाही. पटोलेंची या प्रकरणात चौकशी तर केली पाहिजेच जोडीला कारवाई केली पाहिजे व पंतप्रधानांची विशेष काळजी घेतली पाहिजे. नाना पटोले हे पूर्वाश्रमीचे भाजपवाले आहेत. पंतप्रधानांना विरोध करत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची ड्रायव्हिंग सिट कधी काबीज केली हे कोणाला कळले नाही. नरेंद मोदी यांच्या विरोधात सतत भडकावू बोलणे आणि हायकमांडकडून शाब्बासकी मिळवणे असा त्यांना नाद लागला असावा, वादात, चर्चेत राहणे हे त्यांना प्रिय आहे. त्यांनी दिलेला स्वबळाचा नारा असाच चर्चेचा झाला होता. पण शरद पवारांनी पटोले यांची विधाने, खंजीर वगैरे आरोप यांची आपण दखल घेत नाही असे म्हणत काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष अदखलपात्र आहे असे सुचित केले होते. राजकारणाचे खच्चीकरण, नेतृत्वाचे खुजेकरण आणि तत्वनिष्ठ, विचारनिष्ठ, चारित्र्यसंपन्न राजकारणाचा ऱहास वाढत वाढत टोकावर पोहोचला आहे. भाजपाने नाना पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज्यातील महाआघाडी सरकार तोंडे बघून कायद्याची अंमलबजावणी करते आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचा पंतप्रधान देशाचा प्रथम नागरिक असतो. तो कोणत्याही पक्षाचा असला तरी तो देशाचा असतो त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा सर्वांनी सांभाळली पाहिजे हे साधे सूत्र आहे. पण काँग्रेससारख्या इतक्या मोठय़ा व दीर्घ परंपरेच्या पक्षाला त्याचे भान नसेल तर कठीण आहे. जनसामान्यांनीच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने दिलेल्या मताचा प्रयोग करून राजकारणात शुचिता आणली पाहिजे. राजकारणाचे शुद्धीकरण करून गावपातळीपासून दिल्लीपर्यंत धुडगूस घालणारे, तोडपाणी करणारे, सभ्यता, सेवाभाव सोडणारे गणंग वेचून फेकले पाहिजेत. अन्यथा काम-धाम, प्रगती-उन्नती, विचार सेवा शुचिता बाजूला पडेल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असताना राजकारणातील सभ्यता आणि शुचिता हे विषय लोकांनीच हाती घेतले पाहिजेत आणि वाचाळविरांना चापही लावला पाहिजे.