रशियाचे युक्रेनवर ड्रोनहल्ले सुरूच
पायाभूत सुविधांचे नुकसान : कीवमधील अपार्टमेंटचीही हानी झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ कीव
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाची धार अद्याप कमी झालेली दिसत नाही. शनिवारी रात्रीही रशियाने युक्रेनवर सुमारे 143 ड्रोन डागत गोळीबार केला. यापैकी 95 ड्रोन पाडण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती देण्यात आली नसली तरी दक्षिणेकडील मायकोलाईव्ह शहरातील पायाभूत सुविधांच्या इमारतीला आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच कीव प्रदेशात घरांचे नुकसान झाले.
मायकोलाईव प्रदेशाचे गव्हर्नर विटाली किम यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर हल्ल्यासंबंधीची माहिती दिली. ड्रोन हल्ल्यामुळे लागलेली आग लवकर विझवण्यात आली. यात काही पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असे ते म्हणाले. ड्रोनमधून झालेल्या हल्ल्यांमुळे पाच अपार्टमेंट इमारती, अनेक दुकाने आणि कार्यालयांचे नुकसान झाले, असे युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने टेलिग्रामवर सांगितले. तसेच कीव राजधानी क्षेत्रात ड्रोन हल्ल्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तथापि, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रशियाकडे आता युक्रेनचा 20 टक्के भाग असून तो हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत सत्तेवर पकड राखण्यासाठी रशियाला युद्धाची आवश्यकता आहे आणि ते दररोज युक्रेनवर बॉम्बहल्ला करून लढाई सुरू ठेवण्याचा आपला हेतू साध्य करतात, असे असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. या आठवड्यातच रशियाने आपल्या लोकांवर सुमारे 1,220 हवाई बॉम्ब, 850 हून अधिक ड्रोन आणि 40 हून अधिक विविध प्रकारची क्षेपणास्त्रs डागली आहेत, असेही झेलेन्स्की म्हणाले.
रशियाने केलेले हल्ले रोखण्यासाठी आपले सैन्य सतर्क आहे. युक्रेनियन लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्याला अधिक हवाई संरक्षण प्रणालींची आवश्यकता आहे. युरोप, अमेरिका आणि आमच्या सर्व भागीदारांसोबत मिळून आपण हे युद्ध न्याय्य आणि चिरस्थायी शांततेने संपवू शकतो, असेही त्यांनी पुढे सांगितले. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात पुतिन यांना फोन करून आणि शांतता चर्चा त्वरित सुरू करण्याची घोषणा करून युरोपियन मित्र राष्ट्रे आणि युक्रेनला धक्का दिला आहे.