रशियाची क्षेपणास्त्रे पोलंडच्या हद्दीत
मॉस्को / वृत्तसंस्था
युपेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पोलंडने केला आहे. रशियामध्ये बनवलेली दोन क्षेपणास्त्रे आपल्या देशात पडल्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला, असे पोलंडच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने सांगितले. तथापि, रशियाने पोलंडवर क्षेपणास्त्रे डागल्याचा इन्कार केला. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनीही याबाबत मतप्रदर्शन करत पोलंडमध्ये रशियन क्षेपणास्त्रे पडणे शक्मय नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, युपेनच्या सैनिकांनी केलेल्या प्रत्युत्तरानंतर ही क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अमेरिका आणि ब्रिटनसह नाटो संघटना या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.
रशियाने युपेनवर 100 क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी दोन क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये पडल्याचे सांगितले जात आहे. क्षेपणास्त्र पडल्याच्या वृत्तानंतर पोलंडचे पंतप्रधान मातेउझ मोराविकी यांनी तातडीची बैठक बोलावली. या प्रकरणी तपास सुरू असून रशियाच्या राजदुताकडूनही तातडीने स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे पोलंड सरकारचे प्रवक्ते पिओटर मुलर यांनी सांगितले. तसेच नाटो देशांवरील हल्ला ही गंभीर बाब असून रशियावर कारवाई झालीच पाहिजे, असे युपेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.