येथे कुलुपाचे काय काम?
एका गावातील घरात कधीच लावले जात नाही कुलूप
आपण जेव्हा कधी स्वतःच्या घरातून बाहेर पडता, तेव्हा कुलूप लावण्यास विसरत नसाल. कारण तुमच्यामागून कुणी तुमच्या घरात चोरी करू शकतो ही भीती असते. परंतु आपल्या देशात एक असे गाव आहे, जेथे लोक कधीच स्वतःच्या घरांना टाळे लावत नाहीत. या गावात राहणारे लोक कधीही घरातून बाहेर जातेवेळी दरवाजाला कुलूप लावत नाहीत. हे गाव राजस्थानच्या बुंदी जिल्हय़ातील केशवपुरा आहे.
या गावातील घरांमध्ये कुणीच चोरी करू शकत नाही. बुंदी जिल्हय़ातील केशवपुरा गावाच्या लोकांना चोरी किंवा गुन्हा घडू शकत नसल्याचा विश्वास आहे. याचमुळे लोक बाहेर पडत असताना स्वतःच्या घरांना कुलूपबंद करत नाहीत.
या गावात अनेक वर्षांपासून कुठलीच गुन्हेगारी घटना घडलेली नाही. गावातील सर्व लोक बंधुभावात राहतात, हे लोक पशूपालन करत असून येथे रामराज्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. छोटा-मोठा वाद निर्माण झाल्यास न्यायालयापासून दूर राहत परस्परांमध्ये तडजोड करून तो मिटवितात.
या गावात सुमारे 1 हजार लोक राहतात. यात गुर्जर, माळी आणि मेघवाल समाजाचे लोक आहेत. या गावात चोरी, दरोडा, लूट, हत्या आणि बलात्कार यासारख्या घटना कधीच घडल्या नसल्याचे सांगण्यात येते. याचमुळे येथील लोक स्वतःच्या घरांना कुलूप लावत नाहीत, केवळ कडी लावून ते कामावर जातात. येथी लोकांचा परस्परांवर अत्यंत विश्वास असल्याने कुणीच याची चिंता करत नाही. या गावाशी निगडित एकही गुन्हा नोंद नाही.