येडियुराप्पांवर पोक्सो अंतर्गत एफआयआर
लैंगिक शोषणाचा आरोप : प्रकरण सीआयडीकडे
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. एका महिलेने येडियुराप्पा यांच्यावर आपल्या 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच येडियुराप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या आईने बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील पोलीस स्थानकात 2 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्या महिलेने येडियुराप्पांवर मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या आधारे येडियुराप्पांवर पोक्सो कायद्याच्या सेक्शन 8 आणि आयपीसी सेक्शन 354(अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोप करणारी महिलेचे मानसिक स्वास्थ्य योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी तिने गुंड, राजकारणी, उद्योजक, व्यापारी यांच्यासह 52 जणांविरुद्ध गंभीर आरोप केले होते. आता येडियुराप्पांविरुद्ध तिने केलेल्या आरोपाविषयी संशय व्यक्त होत आहे.
सत्यासत्यता पडताळणार : डॉ. परमेश्वर
दरम्यान, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा हे ज्येष्ठ नेते आहेत. हा संवेदनशील मुद्दा आहे. यात राजकारण नाही. आरोप करणाऱ्या महिलेचे मानसिक स्वास्थ्य योग्य नसल्याचे काहीजण सांगत आहेत. तिने दिलेला तक्रार अर्ज टाईप करून दिलेला आहे. लेखी स्वरुपात नाही. त्यामुळे सत्यासत्यता पडताळण्यात येईल, असे स्पष्ट केले.
कायदेशीर लढा देणार : येडियुराप्पा
याविषयी प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, आरोप केलेली महिला आणि तिची मुलगी महिन्यापूर्वी आपल्या घरी सातत्याने येत होती. मात्र, तिला आत घेतले नाही. एक दिवस ती अश्रू ढाळत असल्याने तिला आत बोलावून चौकशी केली. त्यावेळी तिने आपल्यावर अन्यान झाल्याचे सांगितले. तेव्हा आपण बेंगळूर शहर पोलीस आयुक्त दयानंद यांना फोन करून माहिती दिली व मदत करण्यास सांगितले. त्यानंतर सदर महिला आपल्याविरोधात बोलू लागली. तेव्हा आपल्याला आरोप करणाऱ्या महिलेचे मानसिक स्वास्थ्य चांगले नसल्याचे समजले. तिने केलेल्या आरोपावर कायदेशीर लढा देईन, असे सांगितले.