युद्धबंदी संपताच पुन्हा हल्लासत्र
इस्रायलकडून गाझापट्टीत बॉम्बवर्षाव : 34 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हल्ले वेगवान झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) इस्रायली लष्कराने याला दुजोरा दिला आहे. नव्याने झालेल्या या हल्ल्यांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. सात दिवस चाललेल्या शस्त्रसंधी करारात गुऊवारपर्यंत हमासने इस्रायलच्या 110 ओलिसांची सुटका केली आहे. शुक्रवारी हा करार संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा गाझापट्टीच्या आकाशात लढाऊ विमानांची गर्जना सुरू झाली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील तात्पुरता युद्धविराम शुक्रवारी सकाळी संपल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लष्कराने पुन्हा एकदा गाझामध्ये जमीन आणि हवाई मोहीम सुरू केली आहे. शस्त्रसंधी पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार जाहीर झालेला नाही. हमासशी संलग्न माध्यमांनी गाझाच्या उत्तरेकडील भागात स्फोट आणि गोळीबार ऐकू आल्याचे वृत्त दिले आहे. 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाला सुऊवात झाली. त्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. गुऊवारचा विस्तार हा 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सुऊवातीच्या चार दिवसांच्या युद्धविरामाचा दुसरा विस्तार होता. मंगळवारी शस्त्रसंधी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आली होती. एकंदर सात दिवसांच्या काळात गाझामध्ये ठेवलेले 110 ओलिस आणि इस्रायली तुऊंगातील 240 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली.
हमासने ऑपरेशनल विरामाचे उल्लंघन करत इस्रायली क्षेत्राकडे गोळीबार केल्याचा दावा इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने ट्विटरवर एका पोस्टमध्ये केला आहे. त्यानंतर आयडीएफने गाझामधील हमास दहशतवादी संघटनेविऊद्ध पुन्हा लढाई सुरू केली. सात दिवसांचा युद्धविराम संपण्याच्या काही वेळापूर्वी गाझामधून उडवलेले रॉकेट खाली पाडल्याचे इस्रायलने सांगितले. तर हमास गटाशी संबंधित मीडिया हाऊसेसने उत्तर गाझामध्ये स्फोट आणि गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. गाझापट्टीवर अनेक हवाई हल्ले झाल्याचे हमासच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने आपल्या टेलिग्राम खात्यावर सांगितले.
युद्धविरामासाठी दबावतंत्र सुरूच
दुसरीकडे, युद्धविराम वाढवण्यासाठी हमासला दररोज ओलीस ठेवलेल्या 10 इस्रायली महिला आणि मुलांची सुटका करावी लागेल, अशी अट घातल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी घातली आहे. कराराच्या अटींनुसार, सोडलेल्या प्रत्येक इस्रायली ओलिसामागे तीन पॅलेस्टिनींची सुटका केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. युद्ध टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी ओलिसांच्या देवाण-घेवाणीबाबत मध्यस्थी करणाऱ्या देशांशी सातत्याने वाटाघाटी केल्या आहेत. हमास ओलीस आणि कैद्यांच्या देवाण-घेवाणीसाठी युद्धविराम आणखी वाढवण्यास तयार असल्याचे हमास या दहशतवादी गटाच्या जवळच्या सूत्राने सांगितले. तर अमेरिकेने पुन्हा एकदा इस्रायलला गाझा नागरिकांसाठी सुरक्षित क्षेत्र तयार करण्याचे आवाहन केले आहे. हमासच्या हल्ल्यामुळे सुरू झालेले युद्ध कायमचे संपवण्यासाठी दोन्ही बाजूंवर आंतरराष्ट्रीय दबाव सुरूच आहे.