युद्धक्षेत्रातून लोकांचे पलायन
खारकीव्ह रेल्वेस्थानकावर खचाखच गर्दी
युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खारकीव्ह अभूतपूर्व मानवी आपत्तीला तोंड देत आहे. या शहरातून लोक जणू स्वतःचे जीवन वाचविण्यासाठी घराबाहेर पडले ओत. खारकीव्ह रेल्वेस्थानकावर जणू माणसांचा महापूर आल्यासारखी स्थिती आहे. स्थानकावर सर्वत्र लोकच लोक दिसून येत आहेत. भुकेमुळे रडणारी मुले, वृद्ध, महिला आणि हताश तरुण-तरुणी हेच चित्र तेथे दिसून येते. सर्व जण कुठल्याही मार्गाने रशियाची क्षेपणास्त्रs आणि बॉम्बवर्षावातून स्वतःचा जीव वाचवू पाहत आहेत.
खारकीव्ह रेल्वेस्थानकावर पाय ठेवण्याचीही जागा शिल्लक राहिलेली नाही. प्रतीक्षागृह खचाखच भरलेले आहे. खारकीव्ह रेल्वेस्थानकावरून समोर आलेल्या एका छायाचित्राद्वारे स्थितीचा अंदाज बांधता येतो. स्थानकावर लोकांची प्रचंड गर्दी असून अनेकदा तर स्थानकाचे दरवाजे बंद करण्याची वेळ आली. खारकीव्हमधून लोक युक्रेनच्या सीमेवर पोहोचून देशातून बाहेर पडू पाहत आहेत.
खारकीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्याचा कहर सर्वाधिक दिसून आला आहे. खारकीव्हचा टीव्ही टॉवर रशियाच्या हल्ल्यात नष्ट झाल आहे. या शहरावर रशियाने रविवारी भीषण बॉम्बवर्षाव केला होता. यात 8 जणांना जीव गमवावा लागला होता. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेमधून 15 लाख लोकांनी पलायन केले ओह. यातील बहुतांश लोक सीमावर्ती देश पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.