म्यानमार सैन्याकडून 6 हजार जणांची मुक्तता
ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञासह अनेक विदेशींचा समावेश
वृत्तसंस्था /यंगून
म्यानमारच्या सैन्याने ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञासह अनेक विदेशी नागरिकांची मुक्तता केली आहे. म्यानमारच्या सैन्य राजवटीने आंग सान सू की यांचे माजी सल्लागार तसेच ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञ शॉन टर्नेल यांची तुरुंगातून मुक्तता केली आहे. तसेच अन्य 6 हजार लोकांना कैदेतून मुक्त केल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली.
माजी ब्रिटिश राजदूत विक्की बोमन आणि एक जपानी पत्रकार तसेच चित्रपट निर्माते टोरु कुबोता यांचीही सैन्य राजवटीने सुटका केली आहे. ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञ टर्नेल यांच्यावर देशाच्या गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. बोमन यांच्यावर स्थलांतर विषयक कायद्याचे उल्लंघन तर कुबोटा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप होता. बोमन यांचा त्यांचे पती आणि म्यानमारमधील प्रसिद्ध कलाकार हेटिन लिन यांच्यासोबत कैद करण्यात आले होते.
म्यानमारच्या राष्ट्रीय दिनानिमित्त तुरुंगातून मुक्तता करण्यात आलेल्या लोकांना क्षमा प्रदान करण्यात आली आहे असा दावा म्यानमारमधील एका प्रसारमाध्यमाने सैन्य परिषदेचा दाखला देत केला आहे. 4 विदेशी नागरिक तर 11 प्रसिद्ध व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे.
1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानारमध्ये सैन्याने सत्तेची सुत्रे स्वतःच्या हाती घेत आंग सान सू की यांच्यासह अनेकांना अटक केली होती. सैन्य राजवट आल्यापासून म्यानमारमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. देशातील हिंसेत हजारो जणांना जीव गमवावा लागला असून अनेकांनी देशातून पलायन केले आहे.