मॅट हेन्रीचे 7 बळी, द. आफ्रिका सर्वबाद 95
ख्राईस्टचर्च येथील पहिली कसोटी : दिवसअखेर न्यूझीलंडची 3 बाद 116 पर्यंत मजल, यजमान संघाकडे 21 धावांची आघाडी
वृत्तसंस्था /ख्राईस्टचर्च
मागील 7 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 15 कसोटी सामने खेळण्याची संधी लाभलेल्या मॅट हेन्रीने अवघ्या 23 धावात 7 बळी घेण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकन संघाचा पहिला डाव 49.2 षटकात अवघ्या 95 धावांमध्ये खुर्दा केला. हॅग्ले ओव्हलच्या हिरवळयुक्त विकेटवर किवीज कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्यानंतर मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजीचा सिलसिला सुरु केला.
पहिल्या अवघ्या 4 तासांच्या खेळातच मॅट हेन्रीने 23 धावात 7 बळी, ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. सर्वबाद 95 ही द. आफ्रिकेची न्यूझीलंडविरुद्ध निचांकी धावसंख्या ठरली. हेन्रीने पहिले 3 बळी उपाहारापूर्वीच घेतले आणि यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 बाद 44 अशी दैना उडाली. ते यातून अखेरपर्यंत सावरु शकले नाहीत. हेन्रीने दुसऱया सत्रात आणखी 4 बळी घेतले. यापैकी 2 बळी सलग चेंडूंवर होते. चहापानापूर्वी 50 षटकांआधीच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 95 धावांवर संपुष्टात आला.
त्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 116 धावांपर्यंत मजल मारत 21 धावांची आघाडी प्राप्त केली. हेन्री निकोल्स 37 धावांवर नाबाद राहिला. दिवसभरात 13 गडी बाद झाले आणि 37 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. नाईट वॉचमन नील वॅग्नर 2 धावांवर नाबाद राहिला.
किवीज संघातर्फे निकोल्स व डेव्हॉन कॉनवे यांची दुसऱया गडय़ासाठी 75 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. कॉनवे 36 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा संघ या लढतीत केन विल्यम्सनशिवाय खेळत असून त्याच्या गैरहजेरीत टॉम लॅथम नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. विल्यम्सन ढोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. गत महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रॉस टेलरची देखील न्यूझीलंडला उणीव जाणवू शकते. विल्यम्सन व रॉस टेलर यांनी एकत्रित 198 सामन्यात 43 शतकांसह 15 हजारपेक्षा अधिक धावा नोंदवल्या आहेत. या दोन्ही फलंदाजांशिवाय न्यूझीलंड 2008 नंतर प्रथमच खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : 49.2 षटकात सर्वबाद 95 (झुबेर हमझा 25, व्हेरेन 18, मॅरक्रम 15. मॅट हेन्री 15 षटकात 23 धावात 7 बळी, साऊदी, जेमिसन, वॅग्नर प्रत्येकी 1 बळी). न्यूझीलंड पहिला डाव : 39 षटकात 3 बाद 116 (डेव्हॉन कॉनव्हे 76 चेंडूत 36, हेन्री निकोल्स नाबाद 37, वॅग्नर नाबाद 2. ऑलिव्हिएर 2-36, जान्सन 1-11).