For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुशीर खानचे नाबाद द्विशतक, मुंबई 384

06:45 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुशीर खानचे नाबाद द्विशतक  मुंबई 384
Advertisement

भार्गव भटचे 7 बळी, बडोदा 2 बाद 127, रावतचे नाबाद अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने मुशीर खानच्या नाबाद द्विशतकाच्या बळावर पहिल्या डावात 384 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाने दिवसअखेर 2 बाद 127 धावा जमविल्या असून ते अद्याप 257 धावांनी पिछाडीवर आहेत.

Advertisement

भार्गव भटला मुंबईची सात बळी मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले. मात्र मुशीर खानने नाबाद 203 धावा जमवित मुंबईला सर्व बाद 384 अशी समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. भार्गवने 112 धावांत 7 बळी मिळविले.

येथील बीकेसी ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात यू-19 वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या प्रियांशू मोलियाला एका धावेवर बाद होत तंबूत परतावे लागले. मुंबईच्या शार्दुल ठाकुरने त्याचा एका धावेवर त्रिफळा उडविला. त्यानंतर शम्स मुलानीने ज्योत्सनिल सिंगला 32 धावांवर बाद करून बडोदाला दुसरा धक्का दिला. 23 व्या षटकात बडोदाची स्थिती 2 बाद 65 अशी होती. शाश्वत रावत व कर्णधार विष्णू सोळंकी यांनी डाव सावरताना दिवसअखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रावत 88 चेंडूत 69 धावांवर तर सोळंकी 38 चेंडूत नाबाद 23 धावांवर खेळत होते. रावतने आपल्या खेळीत 9 तर सोळंकीने 2 चौकार मारले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 62 धावांची भागीदारी केली आहे.

मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मुशीर खानने. त्याने प्रथमश्रेणीतील पहिल्या शतकाचे आणखी मोठ्या खेळीत रुपांतर करीत द्विशतक झळकवले. त्याच्या खेळीमुळेच मुंबईला चारशे धावांच्या जवळपास मजल मारता आली. मुशीरने 357 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने नाबाद 203 धावा जमविल्या. पहिल्या दिवशी 4 बाद 99 अशी स्थितीनंतर बशीरने महत्त्वाचे योगदान देत डाव सावरला होता. या 18 वर्षीय फलंदाजाने आठव्या गड्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तमोरेसमवेत 181 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हार्दिकने दडपणाखाली संयमी खेळ करीत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तमोरेने 248 चेंडू खेळताना केवळ 3 चौकार मारत बडोदाच्या गोलंदाजांना रोखले होते. या भागीदारीमुळेच मुंबईला 5 बाद 142 वरून 384 धावांची मजल मारता आली. पहिल्या दिवशी मुंबईच्या चार फलंदाजांना बाद करणाऱ्या भार्गव भटने दुसऱ्या दिवशी आणखी तीन बळी मिळविले तर निनाद रथवाने 86 धावांत उर्वरित 3 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई प.डाव 140.4 षटकांत सर्व बाद 384 : पृथ्वी शॉ 33, मुशीर खान नाबाद 203, हार्दिक तमोरे 57, भार्गव भट 7-112, निनाद रथवा 3-86. बडोदा प.डाव 35 षटकांत 2 बाद 127 : ज्योत्सनिल सिंग 32, शाश्वत रावत खेळत आहे 69, विष्णू सोळंकी खेळत आहे 23, शार्दुल ठाकुर 1-25.

Advertisement
Tags :

.