मुलांना वाचनाची आवड लावताना
06:00 AM Nov 25, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातील सर्वांत पहिला मार्ग म्हणजे मुलांना पुस्तकांची उपलब्धता सहजपणे झाली पाहिजे. ही पुस्तके कुठल्याही विषयावरची असो त्यामध्ये प्राण्यांच्या कथा, साहसी कथा, शोध कथा, लोक कथा, परी कथा इत्यादी सर्व विषयांचा समावेश असावा. त्यातील मजकूर मुलाला समजू शकेल अशा प्रकारची पुस्तके निवडावीत.
Advertisement
- एकदा मुलांनी त्यांची आवड सांगितली की त्याप्रमाणे पुस्तके आणून देऊ शकता. मुलांना स्वतःहून त्यांच्या आवडत्या पुस्तकाची निवड करु द्यावी.
- एखादे पुस्तक वाचल्यानंतर त्याबाबत मुलांशी चर्चा करावी आणि त्यांना अधिक पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यामुळे आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल ऐकण्यासाठी कोणीतरी श्रोता आहे याचा आनंद मुलांना होईल. या आनंदातून मुले अनेक पुस्तके वाचू लागतील. बरेचदा पुस्तकातून मिळालेली विचारांची प्रक्रिया बघून मुले तुम्हाला आश्चर्यचकीत करतील.
- बरेचदा मुले ठराविक प्रकारची, ठराविक लेखकांचीच पुस्तके वाचण्याचा हट्ट करतात. पालकांना मात्र वाटत असते की मुलांनी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचावित. अशा वेळी पालकांनी थोडा संयम दाखवावा. आपल्या आवडीची किंवा आपल्याला वाटेल ती पुस्तके मुलांनी वाचावित असा आग्रह धरु नये. मुले स्वतःच्या आवडीचे मन लावून काही तरी वाचत आहेत ही गोष्ट महत्वाची मानावी.
- काही काळानंतर मुले आपोआपच काहीतरी अधिक चांगले वाचण्याकडे वळतील याबाबत विश्वास बाळगावा. ठराविक वयात मुलांना अद्भूत, रहस्यमय, जादुच्या कथा वाचायला आवडतात. पण वाचनाची आवड एकदा निर्माण झाली म्हणजे काळानुसार आपोआपच विषयाच्या आवडी प्रबळ होत जातात. त्यामध्ये तू अमुकच पुस्तक वाच असा हट्ट धरून पालकांनी मुलांच्या वाचनाची आवड नकारात्मकतेकडे झुकवू नये.
- मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आणखी एक प्रयोग राबवता येऊ शकतो. वाचन ही एक कौटुंबिकरित्या करण्याची गोष्ट बनवावी.
- आपल्या आजुबाजूची घरातली माणसे पुस्तक वाचत आहेत असे चित्र मुलांना लहानपणापासून दिसायला हवे. म्हणजे मुले आपोआपच तसे अनुकरण करु लागतात. घरामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके सहजपणे दिसतील, उचलून हातात घेता येतील अशा प्रकारे ठेवलेली असावीत.
वाढदिवसाची भेट, रिटर्न गिफ्ट्स, बुक्स स्टोअरला भेट, उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या मोठय़ा लायब्ररीला भेट अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण मुलांच्या मनात पुस्तकांबद्दल प्रेम आणि आवड निर्माण करु शकतो. एकदा ही आवड निर्माण झाली म्हणजे आयुष्यभर मुले पुस्तकांची साथ सोडणार नाहीत.
Advertisement
Advertisement
Next Article