मुंबईने केरळला 244 धावांवर गुंडाळले
वृत्तसंस्था/ थुंबा, तिरुअनंतपुरम
रणजी चषक स्पर्धेत मोहित अवस्थीच्या (57 धावांत 7 बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने केरळला 244 धावांवर गुंडाळले. दुसऱ्या दिवशी मुंबईने बिनबाद 105 धावा करत 112 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जय बिस्ता 59 व लालवाणी 41 धावांवर खेळत होते.
पहिल्या दिवशी मुंबईचा पहिला डाव 251 धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशी केरळच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रात सावध सुरुवात केली. सलामीवीर रोहित कुन्नावलने 8 चौकारासह 56 धावा केल्या तर सचिन बेबीने 65 धावांचे योगदान दिले. कर्णधार संजू सॅमसनने 38 तर विष्णू विनोदने 28 धावा केल्या. मोहित अवस्थीच्या भेदक माऱ्यासमोर इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. मोहितने शानदार गोलंदाजी करताना अवघ्या 57 धावांत केरळचे 7 फलंदाज तंबूत पाठवले. यामुळे केरळचा पहिला डाव 55.2 षटकांत 244 धावांवर आटोपला व मुंबईला अवघ्या सात धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात केरळला गुंडाळल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात करताना दिवसअखेरीस 26 षटकांत बिनबाद 105 धावा केल्या. जय बिस्ताने अर्धशतकी खेळी साकारताना 67 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. लालवाणीने देखील 4 चौकारासह नाबाद 41 धावा करत त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईकडे 112 धावांची आघाडी असून आज तिसऱ्या दिवशी ही आघाडी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
महाराष्ट्र-राजस्थान सामना रंगतदार स्थितीत
जोधपूर : रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात महाराष्ट्र व राजस्थान यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. महाराष्ट्राचा पहिला डाव 189 धावांत आटोपल्यानंतर राजस्थानने 270 धावा करत पहिल्या डावात 81 धावांची आघाडी घेतली. यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात सावध खेळताना दुसऱ्या दिवसअखेरीस 27 षटकांत 1 गडी गमावत 66 धावा केल्या आहेत. महाराष्ट्राचा संघ 15 धावांनी पिछाडीवर असून आज तिसऱ्या दिवशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
हैदराबादचा सिक्कीमवर एक डाव व 198 धावांनी विजय
हैदराबाद : रणजी करंडक स्पर्धेच्या या मोसमात हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषवणारा तिलक वर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मोसमात सिक्कीमविरुद्ध त्याने पुन्हा एकदा शतक झळकावले. त्याने सिक्कीमविरुद्ध 111 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 103 धावांची नाबाद खेळी केली. सलामीवीर तन्मय अग्रवालने 125 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने पहिल्या डावात 4 बाद 463 धावा करून डाव घोषित केला. तत्पूर्वी, सिक्कीमचा पहिला डाव 79 धावांत आटोपला. यानंतर दुसऱ्या डावातही हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर सिक्कीमच्या फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. त्यांचा दुसरा डाव 48.3 षटकांत 186 धावांवर आटोपला. हैदराबादने हा सामना एक डाव व 198 धावांनी जिंकत सात गुणांची कमाई केली.