मुंबईच्या हय़ुगो बोमूसला शिस्तपालन समितीची कारणे दाखवा नोटीस
मडगाव : एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात रेफ्रींशी खराब वर्तन केल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने मुंबई सिटी एफसीच्या हय़ुगो बोमूसला कारण दाखवा नोटीस दिली आहे.
बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला होता. दुखापतीच्या वेळेच्या पाचव्या मिनिटाला खेळाचा पुन्हा प्रारंभ करण्यास बोमूसने उशीर केल्याने त्याला चौथे एलो कार्ड मिळाले. त्यानंतर त्याने या निर्णयविरुद्ध रेफ्रीला आक्षेपार्ह आणि निंदनीय भाषा वापरल्याबद्दल त्याला एक मिनिटानंतर थेट रेड कार्ड दाखवले गेले. लीगच्या नियमांनुसार चार एलो व रेड कार्डमुळे आता हय़ुगो बोमूसला दोन सामने मुकावे लागणार आहेत. यामुळे त्याला बेंगलोर एफसी आणि जमशेदपूर एफसीविरुद्धच्या सामन्यात खेळायला मिळणार नाही. शिवाय रेफ्रीच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर बोमूसवर शिस्तपालन समितीने समन्स बजावले असून अतिरिक्त निर्बंध का लावले जाऊ नये म्हणून कारण सांगायला सांगितले आहे. बोमूसला शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत लेखी उत्तर देण्याची मुदत आली आहे.