मुंबईचा पहिला विजय, शेफर्ड ठरला गेमचेंजर
दिल्लीची पराभवाची हॅट्ट्रिक : रोहित शर्मा, इशान किशन चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हंगामातील पहिला विजय नोंदवताना दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केले. रोहित शर्मा, इशान किशन, रोमारियो शेफर्ड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 5 बाद 234 धावांचा डोंगर उभा केला. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व ट्रिस्टन स्टब्ज यांनी आक्रमक खेळी केली पण दिल्लीला 8 बाद 205 धावाच करता आल्या. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव असून गुणतालिकेत ते आता शेवटच्या स्थानी आहेत. विजयासह मुंबईचा संघ सातव्या स्थानी आला आहे. दरम्यान, अवघ्या 10 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह नाबाद 39 धावा झोडपणाऱ्या रोमारियो शेफर्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. 10 धावांवर शेफर्डने त्याला तंबूत पाठवले. यानंतर पृथ्वी शॉ व अभिषेक पोरेल यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पृथ्वी शॉने 40 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारासह 66 धावा केल्या. आक्रमक खेळणाऱ्या पृथ्वीचा अडथळा बुमराहने दूर केला. पोरेललाही बुमराहने बाद केले. त्याने 5 चौकारासह 41 धावा केल्या. यानंतर ट्रिस्टन स्टब्जने 25 चेंडूत 7 षटकार व 3 चौकारासह नाबाद 71 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. स्टब्जला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. शेवटच्या षटकात कोएत्झीने तीन गडी बाद केले तर मोक्याच्या क्षणी बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. यामुळे दिल्लीला 8 बाद 205 धावापर्यंत मजल मारता आली.
वानखेडेवर शेफर्ड, रोहित, डेव्हिडची फटकेबाजी
दिल्लीकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सात षटकांत 80 धावांची भागीदारी केली. मात्र, दोन्ही खेळाडू अर्धशतकापासून दूर राहिले. रोहितने 27 चेंडूत 49 तर इशान किशनने 23 चेंडूत 42 धावा फटकावल्या. दुखापतीतून सावरलेला सूर्या या सामन्यात अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिडने मुंबईचा डाव सावरला. हार्दिक पंड्याने 39 धावांचे योगदान दिले. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला. हार्दिक बाद झाल्यानंतर डेव्हिड व शेफर्ड यांनी डेथ ओव्हर्समध्ये तुफानी फटकेबाजी करत संघाला 20 षटकांत 5 बाद 234 धावांचा डोंगर उभा करुन दिला. टीम डेव्हिडने 21 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 45 धावा केल्या. शेवटी आलेल्या रोमरियो शेफर्डने 10 चेंडूत नाबाद 39 धावा झोडपल्या, शेफर्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले. डावाचे शेवटचे षटक एनरिक नॉर्त्जेने टाकले. या षटकात शेफर्डने एकूण 32 धावा फटकावल्या. शेफर्डची ही खेळीच गेमचेंजर ठरली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 234 (रोहित शर्मा 49, इशान किशन 42, हार्दिक पंड्या 39, डेव्हिड नाबाद 45, शेफर्ड नाबाद 39, अक्षर पटेल व नॉर्त्जे प्रत्येकी दोन बळी).
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 8 बाद 208 (पृथ्वी शॉ 66, पोरेल 41, स्टब्ज नाबाद 71, कोएत्झी 34 धावांत 4 बळी, बुमराह 2 बळी).
आयपीएलमध्ये रोहितचा असाही अनोखा विक्रम
रोहित शर्माने 49 धावांच्या खेळी करून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा हा डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज बनला आहे, ज्याने आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने हा पराक्रम पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध केला तर विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरविरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.