मिझोरममध्ये खाण दुर्घटनेत 8 जण ठार
बीएसएफ पथकाकडून बचाव अन् शोधकार्य
वृत्तसंस्था /ऐझोल
मिझोरमच्या हनथियाल जिल्हय़ात एका दगडाच्या खाणीला दुर्घटना झाली असून यात 12 कामगार अडकून पडले होते. मंगळवारी बीएसएफच्या पथकाने 8 कामगारांचे मृतदेह ढिगाऱयाखालून बाहेर काढले आहेत. मौदढ भागात दुर्घटना घडल्यावर बचाव पथकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले होते. दुर्घटनेनंतर ढिगाऱयाखाली अडकून पडलेले सर्व कामगार हे मूळचे बिहारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेवेळी एबीसीआयएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे 13 कामगार खाणीत काम करत होते. यातील एक कामगार दुर्घटनेत बचावण्यास यशस्वी ठरला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनीत कुमार यांनी दिली आहे. कामगारांसह अनेक यंत्रसामग्रीही ढिगाऱयाखाली गाडली गेली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, बीएसएफ आणि आसाम रायफल्सकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. नजीकच्या गावातील लोक देखील या बचावकार्यात मदत करत आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.