For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सून, मान्सून...

06:27 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मान्सून  मान्सून
Advertisement

देशभरात यंदा चांगल्या मान्सूनचे संकेत देण्यात आले आहेत. देशभरात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पावसाचा देण्यात आलेला अंदाज निश्चितच सुखावणारा म्हटला पाहिजे. जागतिक तापमानवाढ, एल निनासारख्या घटकाची सक्रियता यामुळे जगभरात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. भारतासह बांगलादेश, अमेरिका, आफ्रिका या देशात पसरलेली तीव्र उष्णतेची लाट, काही भागात पडलेला दुष्काळ, तर आखाती देशातील मुसळधार पाऊस अशा त्रिविध आव्हानांशी एकाचवेळी लढावे लागणे, यातूनच बदलते हवामान आणि पर्यावरण हा विषय किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. भारतातील यंदाची दुष्काळसदृश स्थितीही याचाच परिपाक असून, यंदाच्या मोसमी पावसावर देशाची भिस्त असेल.

Advertisement

2023 हे वर्ष सर्वात तापदायक वर्षांपैकी एक ठरले आहे. यासाठी जागतिक तापमानवाढ कारणीभूत आहेच. मात्र एल निनो हा त्यातील मुख्य घटक ठरला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात समुद्र सपाटीचे तापमान सर्वाधिक नोंदविण्यात आहे आले. एल निनोचा प्रभाव, हरित वायूचे उत्सर्जन, वाढलेला उष्मा यामुळे हा परिणाम झाल्याचे युरोपस कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिस या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

2023 ते 2024 मधील अनेक महिन्यात कमाल व किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. याला एप्रिल महिनाही अपवाद ठरलेला नाही. आशियात पसरलेली उष्णतेची लाट, तसेच आफ्रिकेतील दुष्काळही एल निनोचा परिणाम मानला जात आहेत. 2015-16 साली एल निनो उद्भवला होता. तेव्हाही एप्रिल महिन्यात समुद्र सपाटीचे तापमान वाढले होते. यावषी तीच स्थिती आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 13 महिन्याची आकडेवारी पाहता एप्रिल महिन्यात समुद्र सपाटीचे तापमान सर्वाधिक नोंदविण्यात आले आहे. तसेच पृष्ठभागावरील हवेचे तापमान 15.03 अंश सेल्सिअस इतके राहिले. जे की 1991 ते 2020 च्या एप्रिल महिन्यातील सरसरीपेक्षा 0.67 अंश सेल्सिअसने जास्त आहे. तसेच एप्रिल 2016 च्या सरासरीपेक्षा 0.14 अंश सेल्सिअसने जास्त आहे. औद्योगिकीकरणाच्याआधी 1850-1900 या कालखंडाच्या एप्रिलचा विचार करता हे तापमान 1.58 अंश सेल्सिअसने अधिक आहे. या कालावधीत आशियात उष्णतेची लाट, आफ्रिकेत दुष्काळ, तसेच अरबी देशात मुसळधार पाऊस झाला. जगातील अनेक समुद्रधूनित समुद्र सपाटीचे तापमान सध्या अधिक आहे.

Advertisement

जगभरात नैसर्गिक आपत्तीत वाढ

यावषी अनेक देशात नैसर्गिक संकट वाढली आहेत. भारताला एप्रिल तसेच मे महिन्यात तीव्र उष्णतेचा लाटेचा सामना करावा लागत आहे. राजस्थानात बारमेर येथे 48.8 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आहे. बांगलादेश, थायलंड, अमेरिका, आफ्रिकेलाही उष्णतेचा फटका बसला. काही अरबी देशात मुसळधार पाऊस झाला. दुबईला जोरदार पावसाने झोडपले. म्यानमारमध्ये उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले. मेक्सिकोलाही उष्णतेचा सामना करावा लागला. येत्या काही काळात या अनेक भागात उष्णतेची लाट राहणार आहे. ही सर्व संकटे जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत, असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह अनेक भागांत पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात अतितीव्र उष्णतेची लाट पसरली आहे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशालाही उष्णतेने झोडपून काढले आहे.

पाणीसाठा तळाला

गेल्यावषी पाऊस कमी झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. धरण साठा कमी झाला असून, पाणवठे कोरडे पडले आहेत. मराठवाड्यात विहीरीदेखील कोरड्या पडल्या असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील सर्व धरणांत मिळून 23.63 टक्पे इतका पाणीसाठा आहे, त्यात छत्रपती संभाजीनगर 9.55, पुणे 17.59, कोकण 37.11, नाशिक 25.74, नागपूर 38.83, अमरावती 39.94 टक्के पाणीसाठा आहे.

मान्सूनची सुवार्ता सरासरीपेक्षा अधिक पाऊस

गेल्यावषी पावसाने ओढ दिल्यानंतर यंदा सरासरीपेक्षा अधिक अर्थात 106 टक्के पावसाचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे सध्यातरी पावसाच्या या सुवार्तेने देशवाशियांचा जीव सुखावला आहे. सर्वसाधारणपणे देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत 87 सेंमी इतका पाऊस पडतो. यावषी सरासरीच्या 106 म्हणजे अधिकच्या पावसाची शक्मयता आहे. या अंदाजात 5 टक्के कमी अधिकतेचा अंदाज आहे. हवामान विभागाचा अंदाजानुसार, अधिकचा पाऊस 31 टक्के, अतिरिक्त पाऊस 30 टक्के, सरासरी इतका पाऊस 29 टक्के, तर दुष्काळाची शक्मयता सर्वात कमी 2 टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे.

सर्वदूर दमदार पाऊस - महाराष्ट्र कर्नाटक गोव्यात पाऊस सुखाचा

दीर्घकालीन अंदाजानुसार देशभर सर्वदूर यंदा चांगला पाऊस राहणार आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, पॉंडेचेरी, आंध्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढचा बहुतांश भाग, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच सिक्कीम, अऊणाचल प्रदेशच्या काही भागात पाऊस दमदार राहणार आहे. दिल्ली, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगालमधील काही भागात अतिरिक्त पावसाची शक्मयता आहे.

पूर्वोत्तर भारत, ओडिशात पाऊस कमी

पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये, ओडिशा, जम्मू-काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेशातील काही भागात मात्र पाऊस ओढ देईल. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज आहे.

ला निनो येणार; एल निनोची कमकुवत होणार 

प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव आता ओसरत असून, तो स्थिर आहे. मान्सूनच्या आरंभापर्यंत एल निनो कमजोर होणार होईल. तसेच मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ला निनो निर्माण होण्याची शक्मयता अधिक आहे. सध्या इंडियन ओशन डाय पोल ही तटस्थ आहे. या सर्व बाबी चांगल्या मान्सूनला पोषक आहेत.

स्कायमेटच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस

दुसरीकडे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार, जूनमध्ये सरासरीचा 95 टक्के पाऊस, जुलै 105 टक्के, ऑगस्ट मध्ये 98 टक्के, सप्टेंबर मध्ये सरासरीच्या 110 टक्के पावसाची शक्मयता आहे.

दक्षिण आशियाई देशात यंदा मान्सूनची कृपा

दक्षिण आशियाई देशांवरही यंदा मान्सूनची कृपा राहणार असून, बहुतांश देशांत यावषी सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा अंदाज सासकॉफ या दक्षिण आशियाई क्लायमेट आऊटलुक फोरमने वर्तविला आहे. दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, श्रीलंका, मालदीव या देशांचा सासकॉफ फोरममध्ये समावेश आहे. यावषी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशमध्ये दमदार पाऊस राहणार आहे, तर अफगाणिस्तान, म्यानमार व मालदीवच्या दक्षिण भागात पावसाची ओढ असेल.

भारतात मान्सून दाखल

19 मे रोजी नैत्य मोसमी वाऱ्यांचे अंदमानात आगमन झाले असून, बंगालच्या उपसागरातील काही भागासह त्याने अरबी समुद्रात प्रवेश केला आहे. मान्सून केरळात 31 मे, तर महाराष्ट्रात 6 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. केरळ, व महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले, तर देशवासियांना दिलासा मिळू शकेल.

दुष्काळाचे मळभ दूर होणार

मागच्या वर्षी पावसाने ताण दिल्याने यंदाचा उन्हाळा देशासाठी अतिशय कडक ठरला आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमधील जलाशयांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. कित्येक भागांत दुष्काळसदृश स्थिती असून, गावे, वाड्यावस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरांतही पाणीकपात करण्यात आल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहे. कूपनलिका आटल्याचेही पहायला मिळत आहे. त्या अर्थी यंदाचा उन्हाळा सर्वांसाठी चांगलाच कसोटीचा ठरला आहे. मात्र, मान्सूनची चाहूल लागल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचा अनुशेष मान्सून भरून काढेल, अशीही अपेक्षा आहे.

रैमेल चक्रीवादळ येणार

बंगालच्या उपसागारातील न्यून दाबाचे चक्रीवादळात ऊपांतर होणार असून, ते पश्चिम बंगालची किनारपट्टी ते बांग्लादेशच्या किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. 26 मेपर्यंत हे वादळ किनारपट्टीला पोहोचेल. यंदाच्या वर्षातील हे पहिले वादळ ठरले आहे.

जागतिक तापमानवाढ व पर्यावरण संवर्धनाची गरज

जागतिक तापमानवाढ हा सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. हरितवायूंचे उत्सर्जन हे यामागील प्रमुख कारण आहे. विकसित तसेच विकसनशील देश याप्रकरणी एकमेकांवर आरोप करीत आहेत. समुद्रसपाटीचे तापमान वाढणे, हिमस्तर वितळणे, नैसर्गिक अपदांमध्ये वाढ हे त्याचेच परिणाम आहेत. एका अभ्यासानुसार, बर्फ वितळत असल्याने समुद्रपातळीत वाढ होत असून, समुद्रकिनाऱ्यावरील शहरे बुडण्याचा अंदाज आहे. सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट, कमी कालावधीत जोरदार पाऊस हेदेखील त्याचेच परिणाम आहेत. पॅरिस करारानुसार हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याकरिता जगातील अनेक देश यात सहभागी झाले आहेत. वेळीच यासाठी प्रयत्न करणे, आता गरजेचे झाले आहे.

एकूणच देशाची कृषी अर्थव्यवस्था व अर्थकारण हे प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन, वाटचाल हा अत्यंत महत्त्वाचा विषय होय. साधारपणे 15 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापतो. तर 15 जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यंदा मोसमी पाऊस कसा होतो, त्याचा प्रवास कसा राहतो, हे पहावे लागेल. मान्सून सर्वदूर बरसावा आणि दुष्काळाचे, निराशाचे मळभ दूर व्हावे, हीच सर्वांची अपेक्षा असेल.

- अर्चना माने-भारती, पुणे

Advertisement
Tags :

.