महाविद्यालये गजबजली
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील पदवी, पदव्युतर व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवणारी सर्व महाविद्यालये सोमवारी सुरू झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयातील वर्ग सुमारे अकरा महिन्यानंतर नियमितपणे भरले आहेत. यामुळे सर्वच कॉलेजचे कॅम्पस विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने बहरली आहेत. लॉकडाऊनमध्ये दुरावलेले मित्र-मैत्रिणी आता नियमित भेटणार असल्याने तरूणाईची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले शिक्षण क्षेत्र टप्प्या-टप्प्याने खुले झाले आहे. अनलॉकच्या अंतिम टप्प्यात आता अकृषिक विद्यापीठांसह अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांबरोबरच त्यांच्याशी संलग्न्रित महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली आहेत. जिह्यातील पदवी, पदव्युत्तर व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवणाऱया सर्व महाविद्यालयांमध्ये नियमितपणे वर्ग भरले आहेत. शासनाच्या कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यावर महाविद्यालय व्यवस्थापनाकडून भर दिली जात आहे.
वर्गात जागेची उपलब्धता पाहून महाविद्यालयांकडून 50 टक्के विद्यार्थ्यांना रोटशन पद्धतीने बोलवण्यात येत आहे. बहुतांश महाविद्यालयांचे प्रथमसत्र अभ्यासक्रम यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा असे नियोजन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालये सुरू झाली असली तरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अध्यापन सुरू राहणार आहे. यामुळे प्राध्यपक वर्गाची दमछाक होणार आहे.
उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
सातारा ः सध्या जिह्यातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून साखर कारखान्यांना ऊस पुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते उखडल्यांमुळे तसेच डांबर निघून गेल्याने खचले आहेत. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त भरली जातात. त्यामुळे अशा रस्त्यांवरुन जाताना झोल बसून ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी होत आहेत. ऊस वाहतुकीसाठी कारखान्यांनी शेतशिवारातील रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी ऊस वाहतुकदारांतून होत आहे.
थिएटरकडे रसिकांची पाठ
सातारा ः सातारा शहरातील चित्रपटगृहामध्येही सोशल डिस्टन्सिंग ठेवून चित्रपटांचे खेळ सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्त राहिलेल्या सिने रसिकांना मनोरंजनाचे दार खुले झाले आहे; पण कोरोना कमी झाला असला तरी संपलेला नाही, अशी खूणगाठ कायम असल्याने चित्रपटगृहांकडे रसिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिह्यातील सर्वच चित्रपटगृहांना सिनेरसिकांची प्रतिक्षा करावी लागत आहे.
मास्ककडे नागरिकांचे दुर्लक्ष
सातारा ः जिह्यात कोरोनाबाधितांची कमी झालेली संख्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत आहे. तरीही ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कोरोनाकडे गांभीर्याने पाहात नाहीत. तसेच नागरिक मास्क वापरण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. तसेच गर्दीत नागरिक वावरत असल्याने कोरोनाचा धोका आणखी संभवतो. त्यामुळे मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाईची मागणी होत आहे.