महाराष्ट्राचा ऑक्सिजन रोखणाऱया कर्नाटकला धडा शिकवा
माजी आमदार सदाशिवराव सपकाळ : कर्नाटकाचे पाणी रोखण्याची केली मागणी : अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रासाठी वापरा
प्रतिनिधी / सातारा, कुडाळ
ऐन उन्हाळ्यात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही वेळप्रसंगी कोयना धरणातून आपण अगदी आपत्तकालीन विमोचन गेटमधून ही कर्नाटक राज्याला पाणी दिले आहे. मात्र, त्यांची सार्वत्रिक गरज भागवूनही जर ते कोरोनासारख्या महामारीत पश्चिम महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन रोखून कर्नाटक सरकार कृतघ्नता दाखवत आहे. तर सातत्याने कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय करत असतील तर त्यांचे पाणी रोखून त्यांना धडा शिकवा, अशी मागणी माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्हय़ातील कोयना धरण ही महाराष्ट्राची वरदायिनी आहे मात्र, यासोबतच या धरणातील पाण्यावर महाराष्ट्रासह पुर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश ही दोन राज्येही सुजलाम सुफलाम झाली आहेत. सातारा जिह्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातून जाणाऱया पाण्यावरच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाचे भवितव्य अवलंबून असते. तब्बल 105 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात जवळपास सत्तरहून अधिक टक्के पाणी हे पश्चिम महाराष्ट्रातूनच जाते.
महाराष्ट्राच्या कोयनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या अलमट्टी धरणातील पाण्यावर कर्नाटकचा बहुतांशी भाग ओलिताखाली येतो व त्यांची सिंचनाची गरज भागवली जाते. वास्तविक महाराष्ट्र राज्य त्यांना या पाण्याच्या निमित्ताने भरभरून देत असले तरी याबाबत कृतज्ञता दाखविण्याऐवजी त्यांच्याकडून नेहमीच कृतघ्नपणा दाखवला जातो ही वस्तुस्थिती आहे. नेहमीच कर्नाटक राज्याने आपल्याशी दुजाभाव केला आहे हा इतिहास आहे.
दीडशेहून अधिक टीएमसी पाणी कर्नाटकला
गेल्या काही वर्षांत तर पावसाचे प्रमाण वाढल्याने दरवर्षी याच पश्चिम महाराष्ट्रातून दिडशेहून अधिक टी.एम.सी. पाणी हे कर्नाटकला जाते. दरम्यानच्या काळात त्यांनी तेच पाणी अलमट्टीतून पुढे आंध्रप्रदेश मार्गे समुद्राला सोडणे आवश्यक असते. परंतु अलमट्टी पूर्ण भरेपर्यंत वाट पहायची आणि नंतर पुढे मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडल्यावर त्यांच्या राज्यातील हानी होईल त्यामुळे परिणामी कमी पाणी सोडायचे अशी आडमुठी भुमिका ते घेतात.
कर्नाटकच्या आडमुठेपणाने महापुराचे संकट
याच आडमुठी धोरणांतून याच अलमट्टीचे पाणी फुगीवाटे सांगली, कोल्हापूरसह सातारा जिह्यातील कराडपर्यंत येते यातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुके जलमय होतात. अतिवृष्टी, महापूराच्या काळात ही फुगी प. महाराष्ट्रात अब्जावधींची वित्त व त्याच पटीत जीवीत, पशुधन हानीही करते. याबाबत कितीही विनंत्या केल्या तरी वर्षानुवर्षे त्यांच्या आडमुठी धोरणांत कोणताही बदल होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे आपण त्यांची पाण्याची गरज भागवूनही त्यांनी ऐन पावसाळ्यात आपल्याला पाण्यात घालायचे हा इतिहास आता बदललाच पाहिजे.
पावसाळय़ात वाया जाणाऱया पाण्याचा वापर करा
105 टि. एम. सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या या कोयना धरणातील पावसाळ्यातील वाया जाणाऱया अतिरिक्त पाण्यावर त्याच काळात ते पाणी पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी वापरून ज्यादा वीज निर्मिती करणे शक्य आहे. यामुळे पुर्वेकडे त्या काळात येणाऱया महापूराचा धोका कमी होईल, अब्जावधींची वित्त, जीवीत व पशुधन हानी टाळू शकतो व अतिरिक्त वीजनिर्मितीतून राज्याला अब्जावधींचा अतिरिक्त महसूल प्राप्त होवू शकतो. गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होत असली तरी कृष्णा कावेरी पाणीवापरच्या लवादाच्या नावाखाली राज्य व केंद्रातील मान्यवरांनी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे.
लवादाचा निर्णय राज्य शासनाकडून दुर्लक्षित
वास्तविक ज्या पाण्याचा कोणालाच फायदा तर होतच नाही याउलट तेच पाणी स्थानिकांच्या मुळावर उठत असताना त्याचा सकारात्मक वापर होणे आवश्यक आहे. यासह लवादाने पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त पंचवीस टी.एम.सी. पाण्याला हिरवा कंदील दाखविला असला तरी त्याची राज्य शासनाने अपेक्षित दखल घेतली नसल्याने अद्यापही त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या पाण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावेत याचा पश्चिम महाराष्ट्राला वीज व सिंचनासाठी याहीपेक्षा अधिक वापर करण्यात यावा त्याचवेळी कर्नाटकची मुजोरीही मोडीत काढण्यासाठी आपण याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.