For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मल्टिटास्किंग गरजेचे पण...

06:00 AM Oct 13, 2021 IST | Tarun Bharat Portal
मल्टिटास्किंग गरजेचे पण

पहिल्यापासूनच महिलांकडून तिने एकाचवेळी अनेक ठिकाणी सारखंच लक्ष द्यावं आणि बरीच कामं योग्य प्रकारे पूर्ण करावीत अशी अपेक्षा केली गेली आहे. त्यामुळे मल्टिटास्किंग असणं ही आजच्या सुपरवुमनची तर गरजच होऊन बसली आहे.

मल्टिटास्किंग म्हटलं की पुलंचा ‘नारायण’ आठवतो, ‘वन मॅन आर्मी’ असल्यासारखा तो सगळ्या आघाडय़ांवर लढत असे. त्याच्याशिवाय लग्नातलं एकही पान हलत नसे. अशी माणसं आपल्यालाही भेटत असतात. स्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर घर आणि ऑफिस अशी दुहेरी कसरत करावी लागणार्या अनेक त्रिया असं मल्टिटास्किंग सततच करत असतात.

  • काही वर्षापूर्वी मुलीला कोणकोणत्या गोष्टी करता येतात याची लग्नाआधी चाचणी घ्यायचे. त्यात जिला सगळं काही येतं तिला पसंती जास्त असायची. आता त्या वधुपरिक्षाही गेल्या आणि ती कामंही. पण आजकाल मुलीला बरीच कामं एकाचवेळी करता येतात का याचा मात्र अंदाज घेतला जातो. 
  • बहुतांश स्रियांना आज कोणतीही गोष्ट करताना त्याचबरोबर आणखी किती गोष्टी करता येत आहेत याची चाचपणी करावी लागते. सकाळी आवरताना कामवाली बाईच्या कामांची यादी फ्रिजवर लावायची जबाबदारी असो की प्रवास करताना ऑफिसमधल्या पुढच्या कामांची रांग लावणं असो तिच्याकडून या गोष्टी अगदी सहज अपेक्षित असतात. बरेचदा त्यात त्यांना यशही येतं. बर्याचजणी हा शो चांगला मॅनेज करतात. घरचं आणि ऑफिसचं काम अगदी चोख सांभाळतात, मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या इतर ऍक्टीव्हीटीजवर त्यांचं योग्य लक्ष असतं. घरात होणार्या कार्यक्रमांपासून ते पाहुण्यांच्या आदरातिथ्यापर्यंत त्या बर्याच गोष्टी करत असतात. पण या सगळ्याचा त्यांच्या शारिरीक किंवा मानसिक क्षमतेवरही होत असतो. 
  • दोन कामं एकाचवेळी सारख्याच ताकदीने किंवा लक्षपूर्वक करणं ही खरंच कौशल्याची गोष्ट आहे. त्यासाठी मेंदू आणि शारीरिक हालचाली यांचं योग्य संतुलन असावं लागतं. त्यासाठी मेंदू एकाचवेळी दोन वेगवेगळ्या कामात सारखाच चालू असावा लागतो. हे करताना त्यावर अतिरिक्त ताण येणार हे तर उघडच आहे. तो ताण नंतर शरीरावरही जाणवणार. याचा परिणाम नंतर कुठेतरी तुमच्या शरीरावर किंवा मनावर होत असतो.
  • लक्षात न राहणं, ठराविक गोष्टीतील रस कमी होणं किंवा काहीच न करावंसं वाटणं या त्यातल्या काही सामान्य लक्षणांपैकी एक आहेत. वर्षानुवर्षे जेव्हा मेंदू आणि शरीर एकाच लयीत काम करत असतात तेव्हा त्यांना त्याची सवय होते खरी पण शेवटी ही दोन्हीही यंत्रच आहेत. त्यांना कधीतरी आराम किंवा नव्या कामाचा बदल हा दिलाच पाहिजे.
  • आपली जीवनशैलीचं अशी होत चालली आहे की आपल्याला मल्टिटास्किंग असल्याशिवाय पर्याय राहत नाही. पाच दिवस काम आणि दोन दिवस आठवडय़ाभरातील राहिलेली कामं, पुढची तयारी, खरेदी, मनोरंजन, मित्र किंवा नातेवाईंकांना भेटणं अशा अनेक डगरींवर हात ठेवावे लागतात. त्यामुळे कमी वेळात अनेक कामं उरकण्याची सवय लागते. मात्र एक टप्पा झाला की यातली यांत्रिकता जाणवू लागते. म्हणूनच आपलं यंत्र न होऊ देता हे मल्टिटास्किंग कसं एन्जॉय करता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल.
  • यातला सोपा पर्याय म्हणजे आपलं शरीर हे यंत्र नाही त्याला मधूनच विश्रांतीची, मनोरंजनाची किंवा बदलाची गरज आहे हे आधी जाणून घेतलं पाहिजे आणि ते मनाला पटवलंही पाहिजे.
  • सतत कामात गुंतून राहणं ही चांगली गोष्ट असली तरी विश्रांतीलाही महत्व दिलं पाहिजे. विशेषतः जेव्हा सकाळचा बराच वेळ अनेक कामं पटापट निपटून टाकण्यासाठी खर्च होतो तेव्हा नंतर काही वेळ शांतपणे घालवला पाहिजे.
  • एकावेळी एक काम पण लक्षपूर्वक करण्यावर भर दिला पाहिजे. मल्टिटास्किंग करावंच लागत असेल तर ज्यात मेंदू आणि शारिरीक हालचाली यांची विषम विभागणी असेल अशी कामं एकत्र करायला हवीत. म्हणजे जिथे मेंदूचं काम सुरू असेल तेव्हा हाताला सहज जमेल असं काम करणं श्रेयस्कर आहे. तेव्हा मल्टिटास्किंग करा पण त्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावरही अतिरिक्त ताण येऊन सगळाच शो बंद पडणार नाही; याची काळजीही अवश्य घ्या !
Tags :

.