मतमोजणीमुळे मनपा कामकाजावर परिणाम
कर्मचाऱ्यांबरोबरच संगणकही हलविली मतमोजणी केंद्रांमध्ये
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा मतमोजणी मंगळवार दि. 4 रोजी होणार आहे. त्यामुळे या का`मासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच तेथील काही संगणकही मतमोजणी केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या कामकाजावर झाला आहे. सोमवारी अनेक जण कामासाठी आले होते. मात्र त्या ठिकाणी ते अधिकारी तसेच कर्मचारी नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.
लोकसभा मतमोजणीची जोरदार तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही तयारी केली असली तरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्या कामासाठी जुंपण्यात आले आहे. मात्र त्याचा परिणाम दैनंदिन कामांवर झाला आहे. महानगरपालिकेमध्ये व्यवसाय परवाना तसेच कर भरणे, बांधकाम परवाना घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोमवारी रिकाम्या हाती परतावे लागले. यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गुंतविण्यात आले होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या इतर कामांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. आचारसंहिता असल्यामुळे महानगरपालिकेतील सर्व बैठका रद्द झाल्या होत्या. त्यामुळे कोणतेच निर्णय घेता आले नाहीत. महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी बैठक घेण्यासाठी मुभा मागितली होती. त्याबाबत महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. केवळ आपत्कालीन विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीला मुभा दिली होती. मात्र तशी कोणतीच बैठक घेण्यात आली नाही. एकूणच निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.