भूल न देताच 24 महिलांवर शस्त्रक्रिया
बिहारमधील धक्कादायक घटना : वेदनेने ओरडू लागल्यावर तोंड दाबून बंद करण्याचा प्रकार
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमध्ये महिलांवरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना मोठा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. भूल (ऍनेस्थेशिया) न देताच या महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यादरम्यान या महिला वेदनेने ओरडू लागल्यावर त्यांचे तोंड दाबून बंद करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेच्या पूर्ण प्रक्रियेसंबंधी या महिलांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामुळे बिहारच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
एका स्वयंसेवी संस्थेकडून कुटुंब नियोजन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शस्त्रक्रियेसंबंधी कुठलीच व्यवस्था नव्हती. ऍनेस्थेशिया नसल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेद्वारे वैद्यकीय कर्मचाऱयांनी महिलांचे हात, पाय पकडले आणि तोंड बंद केले होते. या अमानवीय पद्धतीनंतर एका मागोमाग एक अशा अनेक महिलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
लोकसंख्या नियंत्रणावरून शासकीय रुग्णालयांमध्ये शिबिर आयोजित करत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करविण्यात येत आहे. या घटनेवरून वाद निर्माण झाल्यावर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.