भारत-न्यूझीलंड आज आमनेसामने
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात, निर्भयपणे खेळण्याचा लक्ष्मण यांचा संघाला सल्ला, दोन्ही संघ वर्ल्ड कपमधील अपयश मागे टाकण्याच्या प्रयत्नात

वृत्तसंस्था /वेलिंग्टन
नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारत व यजमान न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना आज शुक्रवारी येथे होत आहे. आता भारतीय संघात युवा व बिनधास्त खेळण्याऱया खेळाडूंचा समावेश असल्याने या सामन्यापासून वेगळा भारतीय संघ पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे डिबॅकल झाले होते. त्यातून बोध घेत भारताने फलंदाजीत आक्रमक धोरण स्वीकारायला हवे होते. पण दुसरी स्पर्धा जवळ आल्यानंतरही त्यांच्या आघाडी फळीला आक्रमक धोरण स्वीकारण्यात अपयश आले आणि पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाल्यामुळे 2011 नंतर भारताची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. पुढील टी-20 विश्वचषक होण्यास दोन वर्षांचा कालावधी असून या अवधीत आक्रमक खेळावर भर देणाऱया खेळाडूंचा शोध घेत त्यांना तयार करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. इंग्लंडने आक्रमण हेच शस्त्र म्हणून वापर करीत टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळविले.

रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पंडय़ा भारतीय संघाचे नेतृत्व करीत असून पुढील विश्वचषकात तोच भारताचा कर्णधार असण्याची अपेक्षा आहे. या आधुनिक खेळाची गरज लक्षात घेत हंगामी मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण यांच्या व्यवस्थापनाने फक्त टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूंनाच संघात सामील करून घेण्याचे संकेत दिले आहेत. सध्या पुढील वर्षी होणाऱया वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून या स्पर्धेआधी होणाऱया एकूण 12 सामन्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा त्यांचा मानस आहे. विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण रोहित शर्मा व केएल राहुल यांना पॉवरप्लेचा पुरेसा उपयोग करून घेता न आल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली. 2024 पर्यंत होणाऱया टी-20 सामन्यांत या तिघांनाही संधी दिली जाणार नाही, अशी दाट शक्यता आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून भारताला योजना आखाव्या लागणार आहेत.

शुक्रवारी होणाऱया पहिल्या सामन्यात इशान किशन व शुबमन गिल हे सलामीस खेळण्याची शक्यता आहे. पण संघव्यवस्थापन रिषभ पंतला सलामीला खेळण्याची आणखी एक संधी देण्याचा विचार करू शकते. या मालिकेत भारताचा दुय्यम संघ खेळत असला तरी यातील खेळाडूंना बऱयापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव आहे. चार वर्षांपूर्वी यू-19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करीत शुबमन गिल पुढे आला होता. त्याला या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची आशा आहे.
गेल्या वर्षभरात इशान किशनला सलामीला अनेकदा आजमावून पाहण्यात आले आहे. या मालिकेने त्याला संघातील आपले स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली आहे. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळाली असून या संधीचे तो सोने करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. दुखापतीच्या समस्यांमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या वॉशिंग्टन सुंदरचे या मालिकेतून पुनरागमन होत आहे. फलंदाजी व गोलंदाजीत तो आपली कमाल दाखविण्याचा प्रयत्न करेल.
फिंगर स्पिनर्सना मधल्या षटकांत बळी मिळविण्यात येणारे अपयश, ही भारताच्या टी-20 संघाची मुख्य अडचण ठरली आहे. या मालिकेत कुलदीप यादव व यजुवेंद चहल हे पुन्हा एकत्र खेळण्याची अपेक्षा आहे. विश्वचषक स्पर्धेत या दोघांनाही संधी न दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
भारताला जसप्रित बुमराहच्या सोबतीला एका एक्स्प्रेस गोलंदाजाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून उमरान मलिकला या मालिकेत आजमावून पाहिले जाणार आहे. आयर्लंड व इंग्लंडमधील पहिल्या दौऱयात त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. यावेळी तो वेगाशी तडजोड न करता अचूकतेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यावर तो भर देईल. भुवनेश्वर व अर्शदीप नवा चेंडू हाताळतील. हर्षल पटेल व मोहम्मद सिराज यांना या मालिकेत एखादा सामना खेळावयास मिळण्याची अपेक्षा आहे.
यजमान न्यूझीलंडने मात्र पूर्ण ताकदीचा संघ या मालिकेत उतरवला आहे. वर्ल्ड कपमध्ये त्यांनाही पुन्हा एकदा बाद फेरीतून बाहेर पडावे लागल्याने या मालिकेत मुसंडी मारण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. ट्रेंट बोल्टच्या गैरहजेरीत ते वेगवान गोलंदाजांनाही आजमावून पाहणार आहेत. बोल्टने मध्यवर्ती करारातून माघार घेतल्याने त्याला सर्व सामने खेळावयास मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. गुप्टिललाही संघाबाहेर ठेवल्याने फिन ऍलेन व कॉनवे ही त्यांची सलामीची जोडी असेल. वर्ल्ड कपमध्ये विल्यम्सनच्या स्ट्राईकरेटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात बदल करण्याचा तो निश्चितच येथे प्रयत्न करेल.
संभाव्य संघ
भारत : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), पंत, इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, अर्शदीप, उमरान मलिक.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), फिन ऍलेन, ब्रेसवेल, कॉनवे, फर्ग्युसन, डॅरील मिचेल, मिल्ने, नीशम, फिलिप्स, सँटनर, साऊदी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
सामन्याची वेळ : दुपारी 12 पासून
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स.,लाईव्ह स्ट्रीमिंग अमेझॉन प्राईम व्हिडिओ.
टी-20 क्रिकेटमध्ये मुक्तपणे व निर्भयपणे फलंदाजी करण्याची गरज आहे. पण त्याचवेळी सामन्याच्या स्थितीवरही लक्ष ठेवून त्यानुसार खेळाडूंनी डावपेच आखावेत.
-भारताचे प्रमुख प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण