भारत आज इंग्लंडचा वचपा काढण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/गयाना
जेतेपदाची सर्वांत ताकदवान दावेदार असलेली टीम इंडिया आज गुऊवारी येथे आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार असून 2022 च्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताला मिळाली आहे.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शेवटच्या वेळी या दोन देशांचा सामना 19 महिन्यांपूर्वी अॅडलेडमध्ये झाला होता. त्यावेळी जोस बटलर आणि आलेक्स हेल्स यांच्यातील उल्लेखनीय सलामीच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 10 गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला टी-20 संघविषयक धोरणावर संपूर्णपुनर्विचार करावा लागला होता आणि प्रस्थापित सुपरस्टार्सपासून तऊण रक्ताकडे वळावे लागले होते.
यावेळी भारताकडे अनुभवी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील फलंदाजीची अधिक ताकद आहे, मधल्या षटकांमध्ये अधिक आक्रमक पर्याय आहेत आणि त्यांच्या आक्रमणात अधिक फरक आहे. परंतु गतविजेत्या इंग्लंडपासून त्यांना सावध राहावे लागेल. कारण विशेषत: कर्णधार जोस बटलर आणि त्याचा नवा सलामीवीर फिल सॉल्ट दोघेही फॉर्मात आहेत. सध्या टी-20 विश्वचषक राखणारा पहिला पुऊष संघ बनण्यापासून इंग्लंड फक्त दोन सामने दूर आहे.
दुसरीकडे, 2007 मध्ये सुरू झाल्यापासून भारताने ही स्पर्धा जिंकलेली नाही आणि 2011 च्या 50 षटकांच्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर कोणत्याही स्वरूपातील पहिला विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेवर ते आहेत. भारताने जिंकलेली शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये होती. त्यावेळी त्यांनी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला होता. गयाना नॅशनल स्टेडियमवर होणारा हा सहावा आणि अंतिम सामना आहे या ठिकाणी फिरकीपटू खूप प्रभावी ठरले आहेत, परंतु वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळालेली आहे. येथील पाच सामन्यांमध्ये अफगाणिस्तानची युगांडाविऊद्धची 5 बाद 183 ही सर्वोच्च धावसंख्या राहिलेली आहे.
कॅनडाविऊद्धचा पावसात वाहून गेलेला सामना वगळता भारताने प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवून सुपर एटमधील गट-1 मधील अव्वल संघ म्हणून त्यांनी बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. याउलट इंग्लंडने कठीण मार्गाने मजल मारली आहे. स्कॉटलंडविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरविल्यामुळे शेवटी धावसरासरीच्या जोरावर ते स्कॉटलंडच्या पुढे पात्र ठरले.
गट स्तरावर वर्चस्व गाजविलेल्या संघात मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला सामील करून भारताने त्यांच्या सुपर एट मोहिमेदरम्यान अपली बाजू अधिक भक्कम केलेली आहे. तीन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंसह ते नेहमीप्रमाणे आजही उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंग्लंडने विल जॅक्सला सोडून चार आघाडीचे वेगवान गोलंदाज खेळवले असून सॅम करन आणि ख्रिस जॉर्डन हे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर येतात. जॅक्सला फिरकीचा पर्याय म्हणून परत आणण्याचा किंवा अतिरिक्त मुख्य फिरकीपटू म्हणून टॉम हार्टलीला खेळविण्याचा विचार आज त्यांच्याकडून केला जाऊ शकतो.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.
इंग्लं: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड.
सामन्याची वेळ : रात्री 8.00 पासून