For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अंटार्क्टिका संबंधांवर प्रकाश

06:30 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत अंटार्क्टिका संबंधांवर प्रकाश
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय उपखंड आणि दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका या हिममय खंडाचे पुरातन काळापासून कसे नाते आहे, याचे स्वारस्यपूर्ण संशोधन हैद्राबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केले आहे. भारतीय उपखंड आणि हा हिममय प्रदेश यांची टक्कर 100 कोटी वर्षांपूर्वी झाली होती, अशी माहिती या महत्त्वपूर्ण संशोधनातून समोर आणण्यात आली आहे.

डॉ. के. चंद्रकला, ओ. पी. पांडे, बिस्वजीत मंडल, के. रेणुका आणि एन. प्रेम कुमार या संशोधकांनी अनेक वर्षे प्रयास करुन हा भूशास्त्रीय संबंध शोधून काढला आहे. भारतातील गोंडवन आणि आंध्र प्रदेशातील कुडाप्पा पात्र प्रदेशांमधील भूकवचांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Advertisement

संबंध नेमका कसा...

अतिपुरातन काळात भारतीय उपखंड हा ऑस्टेलियाच्या भूस्तराचा एक भाग होता. प्रचंड भूकंपामुळे या बृहतखंडाचे तुकडे झाले आणि भारतीय उपखंड उत्तरेच्या दिशेने युरेशिया प्रस्तराच्या दिशेने सरकू लागला. यावेळी त्याची अंटार्क्टिका खंडाच्या उत्तर भागाशी टक्कर झाली. त्यामुळे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडचे भारतातील पठार दक्षिणेच्या बाजूकडे काही प्रमाणात कलले. या टकरीनंतर भारतीय उपखंडाचा युरेशिया प्रस्तराच्या दिशेने पुन्हा प्रवास होत गेला, असे या संशोधनात आढळून आल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.

गोंडवन हे काय आहे...

गोंडवन किंवा गोंडवाना खडकस्तराने भारताचा पुष्कळसा दक्षिण भाग व्यापला आहे. या भागात 100 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या या टक्करीची चिन्हे आजही पहावयास मिळतात. या भूस्तरीय हालचालींचा मागोवा घेतला असता या टकरीची माहिती मिळते. विशेषत: आंध्र प्रदेशातील उत्तर कुडाप्पा पात्रात अशी चिन्हे स्पष्टपणे आढळतात. गोंडवन किंवा गोंडवाना हा सध्याच्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर, भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशा सध्याच्या भूभागांचा मिळून एक अतिप्रचंड खंड 200 कोटी पेक्षाही अधिक वर्षांपूर्वी अस्तित्वात होता, असे भूगर्भशास्त्रीय संशोधनातून समजले आहे. कालांतराने साधारणत: 100 कोटी वर्षांपूर्वी या प्रचंड खंडाचे अनेक तुकडे झाले आणि ते समुद्रात वेगवेगळ्या दिशांनी पुढे गेले. त्यातून आजचे खंड निर्माण झाले, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा 100 कोटी वर्षांपूर्वीचा कालावधी ‘प्रोटेरोझॉइक कालावधी’ म्हणून ओळखला जातो. भारताच्या कुडाप्पा खोऱ्यातील स्फटिकयुक्त खडक प्रस्तरांच्या रचनेचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.`

Advertisement

.