भारतीय संघासमोर आज बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान
आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक : सेमी-फायनल स्थान निश्चितीसाठी 3 पैकी 2 सामन्यात विजय आवश्यक
ऑकलंड / वृत्तसंस्था
महिलांच्या आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा आज (शनिवार दि. 19) बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुकाबला होत असून स्पर्धेतील मोहीम विजयाच्या ट्रकवर परत आणण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असेल. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चितीसाठी शेवटच्या 3 साखळी सामन्यात किमान 2 विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील भारतासाठी ही लढत महत्त्वाची आहे. ईडन पार्कवरील या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.
यंदा विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय गोलंदाज झगडत राहिले. पण, त्यानंतर प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. पहिल्या 4 लढतीत 2 विजय व 2 पराभव अशी संघाची संमिश्र कामगिरी राहिली. आता स्पर्धेत केवळ तीनच साखळी सामने बाकी राहिले असताना भारताला पहिल्या चारमधील स्थान कायम राखण्यासाठी सर्व आघाडय़ांवर आपला खेळ उंचावण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.
ऑस्ट्रेलियन महिला संघाने यापूर्वी सर्व चारही सामने जिंकत विजयी घोडदौड कायम राखली. पण, त्यांचा हा विजयरथ रोखण्याची भारतीय संघाची क्षमता आहे आणि भारत ते प्रत्यक्षात साकारुन दाखवणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल.
गतवर्षी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अटीतटीने लढवल्या गेलेल्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. पण, त्यापूर्वी त्यांनी मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील या संघाची सलग 26 विजयांची मालिका खंडित केली होती. यंदा विश्वचषक स्पर्धेत भारताचे काही फलंदाज जरुर चमकले. पण, सांघिक स्तरावर ते बऱयाच प्रमाणात अपयशी ठरले.
मिताली व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी फलंदाजी क्रमांकाची अदलाबदल करत तिसऱया व चौथ्या स्थानी फलंदाजी केली. पण, ही चाल या दोन्ही फलंदाजांसाठी फारशी फळली नाही. त्या तुलनेत स्मृती व हरमनप्रीत यांनी उत्तम फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी विंडीजविरुद्ध तडफदार शतके झळकावली आणि सामना जिंकून देणारी भागीदारीही साकारली होती. माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी हरमनप्रीत आता बहरात परतली असून तिने पाचव्या क्रमांकाऐवजी बढतीवर फलंदाजीला यावे, अशी सूचना यावेळी केली.
अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी येथे आपला 200 वा वनडे सामना खेळणार असून बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती प्रारंभीच काही धक्के देऊ शकली तर ही बाब भारताच्या पथ्यावर पडू शकते. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने भारतातर्फे सर्वाधिक 8 बळी घेतले आहेत. मागील सामन्यात भारताला केवळ 134 धावा जमवता आल्या. पण, गोलंदाजांनी त्यानंतरही इंग्लंडचे 6 फलंदाज गारद करत ती लढत शक्य तितकी लांबवण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या लढतीत बहरातील सलामीवीर रॅशेल हेन्सला लवकर बाद करण्यावर भारताला विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. हेन्सने या स्पर्धेत 92 च्या सरासरीने 277 धावांची आतषबाजी केली आहे.
एलिस पेरीने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर उत्तम योगदान दिले असून फिरकीपटू ऍलाना किंग व ऍश्ले गार्डनर देखील प्रभावी ठरत आले आहेत. यापूर्वी, 2017 मधील विश्वचषक उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्याचा येथे वचपा काढण्याचा मेग लनिंग अँड कंपनीचा प्रयत्न असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), रॅशेल हेन्स (उपकर्णधार), डॅर्सी ब्राऊन, निक कॅरे, ऍश्ले गार्डनर, ग्रेस हॅरिस, ऍलिसा हिली, जेस्स जोनासन, ऍलाना किंग, तहिला मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन स्कट, ऍनाबेल सुदरलँड, ऍमाडा-जेड वेलिंग्टन.
सामन्याची वेळ : सकाळी 6.30 वा.
फलंदाजीतील असातत्याचे नेमके कारण असते तर मी त्याची ड्रेसिंगरुममध्ये चर्चा केली असती. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत आमचे फलंदाज उत्तम खेळले. पण, या स्पर्धेतील 4 लढतीत आमची गोलंदाजी प्रभावी झाली नाही आणि यावर आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.
-भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना
ऑकलंडमध्ये टीम इंडियाने खेळली होळी
आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड दौऱयावर असलेल्या भारतीय महिला संघाने ऑकलंडमध्ये शुक्रवारी होळी साजरी केली. बीसीसीआयने याबद्दलचे एक छायाचित्र ट्वीटरवर पोस्टही केले. मिठाई, थंडाई, रंगांची आतषबाजीसह भारतीय खेळाडूंनी ‘होली है’चा गजर केला. शिवाय, परस्परांना शुभेच्छा दिल्या.