भारतीय महिला संघाची विजयी सलामी
पहिल्या टी-20 मध्ये बांगलादेशवर 44 धावांनी मात
वृत्तसंस्था/ सिलेत
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशचा 44 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या समान्यात भारतीय संघातील रेणुका सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाने 20 षटकात 7 बाद 145 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 101 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 44 धावांनी गमवावा लागला.
भारतीय संघाच्या डावामध्ये स्मृती मानधना 2 चौकारांसह 9 धावांवर बाद झाली. शेफाली वर्माने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 तर यास्तिका भाटीयाने 29 चेंडूत 6 चौकारांसह 36 तसेच कर्णधार हरमनप्रित कौरने 22 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा केल्या. अष्टपैलू रिचा घोषने 17 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 तर सजिवन सजनाने 11 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. पूजा वस्त्रकार 4 धावांवर बाद झाली. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटीया यांनी दुसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार कौर आणि यास्तिका भाटीया यांनी तिसऱ्या गड्यासाठी 45 धावांची भर घातली. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 39 धावा जमविताना 1 गडी गमाविला. भारताचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 73 चेंडूत नोंदविले गेले. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे रबिया खानने 23 धावांत 3, मारुफा अख्तरने 13 धावांत 2 तसेच त्रिष्णा आणि फहिमा खातून यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात कर्णधार निगार सुलतानाने एकाकी लढत देत 48 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण तिला इतर फलंदाजांकडून साथ मिळू शकली नाही. मुर्शिदा खातूनने 18 चेंडूत 1 चौकारासह 13, शोरना अख्तरने 18 चेंडूत 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांच्या डावात 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 3 गडी गमविले. बांगलादेशचे अर्धशतक 63 चेंडूत तर शतक 118 चेंडूत नोंदविले गेले. निगार सुल्तानाने 45 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकवले. भारतातर्फे रेणुका सिंगने 18 धावांत 3, पूजा वस्त्रकरने 25 धावांत 2 तसेच श्रेयांका पाटील, दिप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 7 बाद 145 (शेफाली वर्मा 31, यास्तिका भाटीया 36, हरमनप्रित कौर 30, रिचा घोष 23, सजना 11, स्मृती मानधना 9, अवांतर 1, रबिया खान 3-23, मारुफा अख्तर 2-13, फरिहा त्रिष्णा आणि फहिमा खातून प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 20 षटकात 8 बाद 101 (निगार सुलताना 51, मुर्शिदा खातून 13, शोरना अख्तर 11, अवांतर 3, रेणुका सिंग 3-18, वस्त्रकार 2-25, श्रेयांका पाटील, दिप्ती शर्मा, राधा यादव प्रत्येकी 1 बळी).