भारतीय जनता पक्षाचा प्रथम विजय
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून निर्विरोध विजय झाला आहे. अशा प्रकारे ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे प्रथम विजयी उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या मुख्य आणि पर्यायी अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेल्याने, तसेच अन्य सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ते निर्विरोध निवडून आले आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या विजयासंदर्भात त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमधील सर्व 26 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच याहीवेळी विजयी होईल, असा विश्वास पटेल यांनी या प्रसंगी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या गुजरात शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही दलाल यांचे अभिनंदन केले.
अर्ज का फेटाळले...
सुरत मतदारसंघात काँग्रेस नेते निलेश कुंभानी यांनी पक्षाचे मुख्य उमेदवार म्हणून अर्ज सादर केला होता. तसेच पर्यायी उमेदवार म्हणून सुरेश पडसाला यांचाही अर्ज होता. तथापि, दोन्ही उमेदवारांच्या अर्जांवर अनुमोदक म्हणून ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, त्यांच्यासंबंधी संशय निर्माण झाल्याने अर्ज फेटाळण्यात आले. नंतर या अनुमोदकांनी आपण स्वाक्षऱ्या केल्याच नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे, सुरत हा मतदारसंघ मतदान न होताच भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडला आहे. अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाचा काँग्रेसने निषेध केला असून भारतीय जनता पक्षामुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली आहे.