For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पहिली ‘टी-20’ लढत आज

06:58 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारताची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पहिली ‘टी 20’ लढत आज
Advertisement

आफ्रिकन खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा लागणार कस : वर्ल्डकपआधी युवा खेळाडूंना मिळणार मोठी संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ डर्बन

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारताची तीन सामन्यांची टी-20 मालिका आज रविवारपासून सुरू होत असून यावेळी तरूण भारतीय संघाला तगड्या आव्हानाचा सामना करावा लागेल तसेच समोरचे काही प्रश्न सोडवावे लागतील. दुखापतग्रस्त कर्णधार हार्दिक पंड्या ‘आयपीएल’च्या सुऊवातीपर्यंत बाहेर पडलेला आहे, आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्रांती घेतली आहे आणि जूनमध्ये होणाऱ्या ‘टी-20’ विश्वचषकापूर्वी विराट कोहली व रोहित शर्मा यांची ‘टी-20’तील भविष्याबाबत फारसे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील संघाचे यश किंवा अपयश किती महत्त्वपूर्ण राहील याबाबत साशंकता आहे.

Advertisement

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताच्या ‘टी20’ संघाने घरच्या मैदानावरील फलंदाजीस पोषक खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत केले. परंत भारतीय चाहते देखील हे मान्य करतील की, विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर 72 तासांच्या आत सुरू झालेल्या या मालिकेत आव्हान तितके खडतर नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या मुख्य गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली होती आणि जवळपास नऊ आठवडे भारतात घालवलेले काही वरिष्ठ खेळाडू तर इतके थकले होते की, ते तिसऱ्या सामन्यानंतर घरी रवाना झाले. आता, महिनाभर चालणाऱ्या या आफ्रिका दौऱ्यात भारतीय फलंदाजांचा येथील खेळपट्टीवर चांगलाच कस लागणार आहे. उभय संघातील टी 20 मालिकेपासून या दौऱ्याला प्रारंभ होत आहे.

‘टी-20’ मालिकेसाठी भारताकडे 17 खेळाडू आहेत आणि त्यापैकी फक्त तीन, श्रेयस अय्यर, मुकेश कुमार आणि इशान किशन यांचा एकदिवसीय संघातही समावेश आहे. यापूर्वीच्या ‘टी-20’ विश्वषक स्पर्धांत भारताला ज्याचा तडाखा बसलेला आहे तो पारंपरिक सुरक्षित दृष्टिकोन सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाला प्रथम सोडावा लागेल. यशस्वी जैस्वालने आधीच आपण या स्तरासाठी कसे अनुरुप आहोत ते दाखवून दिलेले आहे आणि शुभमन गिल तर आता क्रिकेटच्या सर्व स्वरुपांतील संघांत प्राधान्य मिळत आहे. ऋतुराज गायकवाडने 52 चेंडूंत शतकी खेळी केल्यानंतर त्याच्याकडेही दुर्लक्ष करणे खूप कठीण बनले आहे.

येथेच खरी गोम आहे, कारण जैस्वाल, गिल आणि गायकवाड यांना खेळविले, तर इशान किशन हा फलंदाजीच्या क्रमवारीतील चौथ्या क्रमांकापुढच्या स्थानांसाठी चांगला पर्याय नाही. चौथ्या क्रमांकावर भारताचा ‘टी20’तील धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव येतो. ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड पक्की आहे. त्यानंतर यष्टीरक्षकाचे स्थान येते, जेथे किशनला जितेश शर्माशी स्पर्धा करावी लागेल. जितेश 6 व्या क्रमांकावर फिनिशर म्हणून छान विकसित होत आहे. पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर येतो. तो काही पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीसाठी विख्यात नाही. पण तो ‘आयपीएल’मधील संघाचा कर्णधार आहे. त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅनसेन, गेराल्ड कोएत्झी आणि अँडिले फेहलुकवायो यांच्याकडून आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा केला जाण्याची शक्यता आहे. पण जर अय्यर खेळला, तर रिंकू सिंग या दुसऱ्या फिनिशरला जागा मिळणार नाही. रिंकूने स्वत:च बीसीसीआय टीव्हीवर येऊन सांगितलेले आहे की, तो 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जर किशनला पहिल्या चार फलंदाजांत स्थान मिळाले नाही, तर जितेश सहाव्या क्रमांकावर येईल. ऋतुराज, जैस्वाल, रिंकू आणि जितेश यांच्यासाठी किंग्समिडच्या खेळपट्टीवर जास्त उसळणारा चेंडू वेगळ्या प्रकारचे आव्हान उभे करेल.

वेगवान गोलंदाज एन्गिडी मालिकेबाहेर

भारतीय गोलंदाजीची धार ऑस्ट्रेलियाने बऱ्याच सामन्यांमध्ये बोथट केली होती. परंतु दक्षिण आफ्रिकेत टप्पा महत्त्वाचा असेल आणि चेंडूला मिळणारी उसळी  गोलंदाजांना मोहीत करू शकते. त्यांच्यापुढे क्विंटन डी कॉकचे आव्हान राहणार नसले, तरी हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, कर्णधार एडन मार्करम, हार्ड हिटिंग करणारा ट्रिस्टन स्टब्स आणि उगवता तारा मॅथ्यू ब्रीत्स्की हे भारतीय गोलंदाजांना जड जाऊ शकतात. वेगवान गोलंदाजीचा मुख्य आधार असलेला कागिसो रबाडा याला विश्रांती देण्यात आली आहे. यातच संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे एन्गिडीला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ब्युरोन हेंड्रिक्सला संघात संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील झालेला 33 वर्षीय हेंड्रिक्स दोन वर्षांहून अधिक काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. याशिवाय, संघातील वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्गर, ओटनियल बार्टमन आणि लिझाद विल्यम्स यांच्यावर असेल.

संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका-एडन मार्करम (कर्णधार), ओटनियल बार्टमन, मॅथ्यू ब्रीत्स्की, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिली व दुसरी टी-20), डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन (पहिली व दुसरी टी-20), हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ब्यूरन हेंड्रिक्स, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

प्रक्षेपण : डिस्ने हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स.

आकडेवारीत टीम इंडियाचे वर्चस्व

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आतापर्यंत एकूण 24 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाने आफ्रिकन संघाविरुद्ध 13 सामन्यांत बाजी मारली आहे, तर प्रोटीज संघाने 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.

आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका युवा खेळाडूंसाठी संधी

पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी 20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारत फक्त 6 टी 20 सामने खेळणार आहे. यामध्ये 3 दक्षिण आफ्रिकेत आणि 3 अफगाणिस्तान विरुद्ध भारतात खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना स्वत:ला आजमावण्याच्या फार कमी संधी आहेत आणि अशाच प्रसंगी 21 ते 29 वयोगटातील तरुणांना मोठ्या टप्प्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागते.यामुळे ही मालिका युवा खेळाडूंसाठी महत्वाची असणार आहे.

Advertisement
Tags :

.