महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप विरुद्ध काँग्रेस..कोण सरस

06:35 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात चित्तवेधक आणि सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय कोणता असेल, तर तो भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस या संघर्षाचाच आहे. कारण हे दोनच पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आहेत. त्यांच्यातील संघर्षाच्या परिणामावरच लोकसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. अन्य पक्षांपैकी अनेक, केवळ नावालाच राष्ट्रीय असून त्यांचे अस्तित्व किंवा प्रभाव केवळ एक-दोन राज्यांपुरताच मर्यादित आहे. हे प्रादेशिक पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांच्या बळात वाढ करु शकतात. पण स्वत:च्या बळावर लोकसभा निवडणुकीवर निर्णायक प्रभाव पाडू शकत नाहीत. त्यामुळे, यंदाच्याच नव्हे, तर 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासूनची प्रत्येक राष्ट्रीय निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस या संघर्षाभोवतीच फिरत राहिली आहे. अर्थातच, ही निवडणूकही याला अपवाद नाही. विशेषत: गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या संघर्षात काँग्रेसला खूपच मागे टाकल्याने हा पक्ष पूर्ण बहुमताची सत्ता सलग दोनदा मिळवू शकलेला आहे. आता हा पक्ष हॅटट्रिक करणार का, याचे उत्तर याच संघर्षावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. भारतात असे 200 ते 240 लोकसभा मतदारसंघ आहेत, की जेथे या दोन पक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर असतात. तिसऱ्या कोणत्याही पक्षाला या थेट संघर्षात महत्वाचे स्थान नसते. त्यामुळे हा संघर्ष नेमका कसा आहे आणि तो कसा उक्रांत होत गेला, आणि त्याचा परिणाम कोणत्या निवडणुकीवर कसा झाला, हे जाणून घेणे मनोरंजक ठरणार आहे. या सदरात गेल्या काही निवडणुकांचा आधार घेत या संघर्षाचा मागोवा घेण्यात आला आहे...
Advertisement

थोडी पार्श्वभूमी

Advertisement

? भारतीय जनसंघ आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष 1952 पासून लोकसभेच्या निवडणुकीत भाग घेत आलेले आहेत. त्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे वय होते 67 वर्षांचे, तर जनसंघाचे वय होते सहा महिन्यांचे. त्यामुळे तो संघर्ष काँग्रेसच्या बाजूने एकांगीच होता. ती स्थिती 1989 च्या निवडणुकीपर्यंत होती.

? जनसंघाने लोकसभा निवडणुकीत दुहेरी आकडा 1962 मध्ये 14 जागा जिंकून गाठला. त्यावेळी काँग्रेस सहज 350 च्या आसपास जागा जिंकत होती. 1967 च्या निवडणुकीत जनसंघाच्या 35 जागा आल्या. त्यावेळी स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसच्या जागा 300 च्या खाली घसरल्याचे दिसून आले होते.

? पुढे 1977 मध्ये काँग्रेसला पहिल्या पराभवाला तोंड द्यावे लागले. ज्या जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला, त्यात जनसंघही विलीन झाला होता. पूर्वाश्रमीचे जनसंघाचे असलेले 92 खासदार त्यावेळी जनता पक्षाच्या वतीने निवडून आले होते. काँग्रेसला 154 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे काँग्रेस पुढेच होती.

? 1984 च्या निवडणुकीपूर्वी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट उसळली. 1980 मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून जनसंघाच्या खासदारांनी भारतीय जनता पक्षाची स्थापन केली होती. 1984 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाची प्रथमच लोकसभा निवडणूक होती.

? त्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने उसळलेल्या लाटेत भारतीय जनता पक्षाची अक्षरश: वाताहात झाली आणि अवघ्या दोन जागा आल्या. वाजपेयींसह पक्षाचे सर्व महत्वाचे नेते पराभूत झाले. काँग्रेसला 414 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची तुलनात्मक स्थिती पुन्हा 1952 सारखी झाली होती.

? त्यानंतर मात्र, उत्तरोत्तर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढत गेला. रामजन्मभूमी, शहाबानो आदी प्रकरणांमुळे भारतीय जनता पक्षाकडे हिंदू समाजाचा कल वाढू लागला. देशात हिंदू मतपेढी निर्माण होण्याचा प्रारंभ त्या काळात झाला होता. या मतपेढीचा फटका काँग्रेसला बसण्यासही प्रारंभ याच काळात झाला.

? यापुढे 1989 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 82 तर काँग्रेसला 193, 1991 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 120 तर काँग्रेसला 180 असे दोन्ही पक्षांमधील जागांचे अंतर कमी कमी होऊ लागले होते. भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये वाढ तर काँग्रेसच्या जागांमध्ये घट दिसून येत होती.

1996 पासून भाजप सत्तास्पर्धेत

? 1996 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एक ‘लँडमार्क’ मानली जाते. कारण इतिहासात प्रथमच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला जागांच्या संदर्भात मागे टाकले. तसेच स्वत: दीडशेहून अधिकचा टप्पा गाठला. या पक्षाने 161 जागा मिळविल्या, तर काँग्रेसला प्रथमच दीडशेच्या खाली, अर्थात 142 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने 13 दिवस टिकलेले सरकारही अलटबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात स्थापन केले. ते सरकार जरी अल्पजीव ठरले असले तरी त्या सरकारने भविष्यकाळाची नांदी म्हटली होती.

? त्यानंतर, 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुकांचा अपवाद वगळता, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. तसेच 1998 ते 2004 या काळात युतीचे सरकारही केंद्रात स्थापन करुन सत्तास्पर्धा प्रथमच जिंकूनही दाखविली. या काळात काँग्रेसमध्येही पुष्कळ परिवर्तन होऊन सोनिया गांधींच्या हाती पक्षाची सूत्रे आली होती. नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात थेट बहुमतालाच गवसणी घालून केंद्रात स्वत:चे सरकार स्थापन केले.

संघर्षाचे स्वरुप कसे आहे...

? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील हा संघर्ष संपूर्ण भारतात नाही. तर तो विशिष्ट राज्यांमध्ये आणि ही राज्ये वगळता अन्य राज्यांमधील विशिष्ट लोकसभा मतदारसंघांमध्ये असतो. या स्थितीचा प्रारंभ 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासून झाला. कारण त्या निवडणुकीपासून काँग्रेसला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाची तीव्र स्पर्धा करावी लागलेली आहे. ही स्पर्धा साधी नाही. कारण, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या विचारसरणीतच मोठे अंतर आहे. त्यामुळेही या दोन पक्षांमधील सत्तास्पर्धा अधिक तीव्र आणि तीक्ष्ण अशी आहे. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधातील प्रत्येक संघर्ष जिंकण्यासाठीच स्वीकारतात.

? भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी, उजव्या विचारसरणीचा, तर काँग्रेस निदान वरकरणी तरी डावीकडे झुकलेला मध्यमामार्गी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. शिवाय, 1947 पासूनच काँग्रेसने सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, नंतरच्या काळात निर्माण झालेल्या संघपरिवारातील संस्था यांना कडाडून विरोध केला आहे. समाजवादी आणि डावे यांचीही काँग्रेसशी स्पर्धा होती. पण ती लुटुपुटूची होती. कारण काँग्रेसची विचारधारा आणि या पक्षांची विचारधारा या एकमेकांशी जुळतील अशा होत्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी निर्माण झालेली सत्तास्पर्धा काँग्रेससाठी अधिक बोचरी आणि वेदनादायक होती.

निष्कर्ष कोणता निघतो...

? या निवडणुकीत दोन्ही पक्षांची भिस्त याच थेट संघर्षाच्या जागांवर आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवायचे असेल तर त्याला या जागांवर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांसारखी कामगिरी करणे आवश्यक आहे. शिवाय जेथे त्रिकोणी किंवा बहुकोनी संघर्ष आहे, अशा 300 ते 325 मतदारसंघांमधील 100 हून अधिक जागा जिंकणे आवश्यक आहे. जर 370 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले लक्ष्य पार करायचे असेल, तर दक्षिणेसह सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्कृष्ट कामगिरी करुन दाखविणे अनिवार्य असल्याचे दिसून येते. हे घडणार का, याचे उत्तर मिळविण्यासाठी 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

? काँग्रेसचे ध्येय या निवडणुकीत बहुमत मिळविण्याचे आहे, की केवळ भारतीय जनता पक्षाला रोखायचे आहे, हे अद्याप ‘अॅक्शन’च्या स्वरुपात स्पष्ट दिसून येत नाही. दावे प्रत्येक पक्षाकडून मोठमोठे केले जातात. त्यांना फारसा अर्थ नसतो. पण काँग्रेसचे ध्येय काहीही असले तरी थेट संघर्षाच्या 200 ते 240 जागांपैकी किमान एक तृतियांश जागा जिंकल्याखेरीज तो पक्ष उभारी धरु शकणार नाही, हे स्पष्ट आहे. कारण विरोधी पक्षांच्या आघाडीत समाविष्ट झाल्याने तो पक्ष यंदा सर्वात कमी म्हणजे केवळ 330 जागा लढवित असल्याने आव्हान मोठे आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article