ब्रॅडी, पेगुला, नदाल, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
अमेरिकेच्या तीन महिला टेनिसपटूंनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरूष विभागात स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल, रशियाचे रूबलेव्ह आणि मेदव्हेदेव यांनी शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टी तसेच कॅरोलिना मुचोव्ह यांनीही एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. स्विटोलिना, एलिस मर्टेनस यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाला 6-4, 3-6, 6-3 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पेगुलाने पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतपर्यंत मजल मारली असून ती बफेलो या एनएफएल आणि एनएचएल फ्रांचायजीची कन्या आहे. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीने क्रोएशियाच्या डोना व्हेकीकचा 6-1, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत अमेरिकेची अनुभवी आणि माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्सने रविवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत अमेरिकेच्या पेगुलाने मेलबर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर चार सामने जिंकले असून त्यामध्ये तिने बेलारूसची अझारेंका आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांना पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने अमेरिकेच्या बिगर मानांकित शेल्बी रॉजर्सचा 6-3, 6-4 असा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱया वर्षी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य एका सामन्यात कॅरोलिना मुचोव्हाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा पराभव केला. पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या नदालने इटलीच्या फॉगनिनीचे आव्हान 6-3, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत नदालचा हा उपांत्यपूर्व फेरीतील 43 वा विजयी सामना आहे. इटलीच्या बेरेटेनीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने ग्रीकच्या सित्सिपसला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली आता नदाल आणि सित्सिपस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत यावेळी पुरूष विभागात रशियाच्या दोन टेनिसपटूंमध्ये पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडत आहे. रशियाचा रूबलेव्ह आणि मेदव्हेदेव यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. रशियाच्या चौथ्या मानांकित मेदव्हेदेवने अमेरिकेच्या मँकेंझी मॅकडोनाल्डचा 6-4, 6-2, 6-3 तसेच रशियाच्या आठव्या मानांकित रूबलेव्हने नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. दुखापतीमुळे रूडने हा सामना अर्धवट सोडल्याने तिसरा सेट होऊ शकला नाही.