बिहारमध्ये 6,640 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमुईत कार्यक्रम
वृत्तसंस्था / जमुई
बिहारच्या जमुई भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6,640 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. बिहारचे इतिहासप्रसिद्ध योद्धे आणि वनवासी समाजाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीदिनी जमुईत हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. मुंडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या हस्ते नाणे आणि टपाल स्टँपचेही अनावरण करण्यात आले. बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनानिमित्त आयोजित गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या 11,000 घरांच्या ‘गृहप्रवेशा’च्या कार्यक्रमातही ऑनलाईन भाग घेतला. या घरांचे निर्माण कार्य प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य प्रकल्प, शिक्षण प्रकल्प आणि रोजगार प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. हे सर्व प्रकल्प बिहारच्या जनतेच्या जीवनात समृद्धी आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोबाईल वैद्यकीय केंद्रे
प्रधानमंत्री जनमन कार्यक्रमाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात 23 फिरत्या (मोबाईल) आरोग्य केंद्रांचाही प्रारंभ केला आहे. तसेच ‘धरती अभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या योजनेच्या अंतर्गत आणखी 30 फिरत्या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन त्यांनी केले. बिहारच्या दुर्गम वनवासी विभागांमध्ये वेगाने आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ही केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. या निर्माण कार्यात त्यांचाच पुढाकार आहे.
एकलव्य वसतिगृहांचे उद्घाटन
जमुईत निर्माण करण्यात आलेल्या 10 एकलव्य आदर्श वसतिगृह शाळांचे उद्घाटनही त्यांनी या कार्यक्रमात केले. तसेच 300 वनधन विकास केंद्रांच्या कार्याचा प्रारंभही करण्यात आला. वनवासी विद्यार्थी आणि तरुणांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी ही केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तरुणांना स्वयंरोजगारक्षम करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
जनजातीय स्वातंत्र्यवीर संग्रहालये
भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ दोन जनजातीय स्वातंत्र्यवीर संग्रहालयांचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयात वनवासी समाजांमधून पुढे आलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांसंबंधीच्या वस्तूंचे आणि कागदपत्रांचे दर्शन घडणार आहे. ही दोन्ही संग्रहालये मध्यप्रदेशातील छिंदवाडा आणि जबलपूर येथे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्या समवेत श्रीनगर आणि गंगटोक येथील दोन संशोधन केंद्रांचे उद्घाटनही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. या संशोधन केंद्रांमध्ये भारतातील जनजातींचे संवर्धन आणि विकास करण्यासंबंधीचे संशोधन केले जाणार असून वनवासींसंदर्भातील कागदपत्रांचेही जतन केले जाणार आहे.
मार्ग आणि सामाजिक केंद्रे
बिहारच्या जनजातीय भागांमध्ये संपर्क वाढविण्यासाठी 500 किलोमीटर लांबीच्या मार्गांचीही कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. तसेच जनजातींच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरु शकतील अशा 100 सामाजिक केंद्रांचेही त्यांनी उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे विकासाला साहाय्य होणार आहे.
25 हजार घरांचा प्रकल्प
प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंतर्गत वनवासींसाठी 25 हजार घरे निर्माण करणाऱ्या योजनेचेही त्यांनी उद्घाटन केले. तसेच ‘धरती अभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या 1 लाख 16 हजार घरांच्या निर्माणकार्याचाही शुभारंभ त्यांनी केला. देशाच्या इतिहासात जनजातीय समुदायांचे योगदान प्रचंड आहे. तसेच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात जी भूमिका साकारली, ती कोणीही विसरु शकत नाही. देश सदैव या वनवासी वीरांचा ऋणी राहील, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात काढले.
बिहारमध्ये विकासाला वेग
ड बिहारच्या वनप्रदेशात विकासाला वेग देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
ड पंतप्रधान नरेंद मोदी यांचा गेल्या तीन दिवसांमधला बिहारचा दुसरा दौरा
ड वनवासी समुदायांसाठीच्या अनेक आरोग्यरक्षक योजनांचे पेले उद्घाटन
ड वनवासी समाजांच्या सुविधेसाठी अनेक पायाभूत सुविधांचे निर्माण कार्य