बांगलादेशात 7 मजली इमारतीला आग, 43 ठार
होरपळल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथे सातमजली इमारतीला आग लागल्याने किमान 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत अशी माहिती बांगलादेशचे आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी शुक्रवारी दिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. ही आग मग वरच्या मजल्यांपर्यंत वेगाने फैलावल्याने लोकांना वेळीच तेथून बाहेर पडता आले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या इमारतीत रेस्टॉरंट आणि कपड्याची दुकाने होती. इमारतीतून 75 जणांना बाहेर काढण्यात आले असून यातील 42 जण बेशुद्ध झाले होते. दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 13 वाहनांना पाठविण्यात आले होते. ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 33 तर शेख हसीना नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी विभागात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये 22 जणांवर उपचार करण्यात येत आहेत असे सेन यांच्याकडून सांगण्यात आले.
काही मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड ठरले आहे. तर दुसरीकडे जखमींची स्थिती गंभीर असल्याचे पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इमारतीला आग लागल्यावर लोकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वरच्या मजल्यांच्या दिशेने धाव घेतली होती. यातील अनेक लोकांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शिडीच्या मदतीने बाहेर काढले आहे.