फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
सात्विकसाईराज-चिराग जेतेपदाचे भक्कम दावेदार, सिंधू, प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत यांचाही लागेल कस
वृत्तसंस्था/ पॅरिस
साडेआठ लाख डॉलर्सची बक्षिसे असलेल्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेला आज मंगळवारपासून सुरुवात होत असून त्यातील आपली मोहीम सुरू करताना माजी विजेते सात्विकसाईराज रान्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी सलग तीन स्पर्धांत उपविजेते ठरल्यानंतर आता चौथ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची आशा बाळगून असेल.
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला नोव्हेंबर, 2023 मधील चायना मास्टर्स सुपर 750, जानेवारीत झालेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 आणि इंडिया ओपन सुपर 750 या स्पर्धांत दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर फ्रेंच ओपनमधील विजेतेपदाचे भक्कम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यानिमित्त्ताने त्यांना पॅरिस ऑलिम्पिकची तयारी करण्याच्या दृष्टीने मैदानावरील परिस्थितीचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. कारण पोर्ते दे ला चॅपेल येथील आदिदास मैदान हे पॅरिस ऑलिम्पिकचे एक ठिकाण आहे.
2022 मध्ये फ्रेंच ओपन जिंकलेल्या या अव्वल मानांकित भारतीय जोडीने पुऊष दुहेरीत सातत्य राखलेले आहे. मलेशियाच्या ओंग येव सिन आणि तिओ ई यी यांच्याविरुद्धच्या लढतीने ते सुरुवात करतील. चार महिन्यांनंतर मलेशियातील आशियाई सांघिक स्पर्धेतून बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केलेली दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या दृष्टीने या स्पर्धेला अधिक महत्त्व आहे. गेल्या महिन्यात शाह आलममध्ये झालेल्या वरील स्पर्धेत सर्वच प्रमुख खेळाडू सहभागी झालेले नसले, तरी फ्रेंच ओपनमध्ये ते सारे झळकणार आहेत. आशियाई सांघिक स्पर्धेत एक सामना गमावलेल्या आणि दोन जिंकलेल्या सिंधूसाठी ही मोठी परीक्षा असेल.
जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेली सिंधू कॅनडाच्या मिशेल लीविऊद्धच्या सामन्याने मोहिमेची सुऊवात करेल आणि त्यात विजयी झाल्यास तिची गाठ तीन वेळची माजी जगज्जेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याशी पडण्याची शक्यता आहे. डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीतील गाजलेल्या लढतीनंतर या दोन खेळाडू प्रथमच या स्पर्धेतून आमनेसामने येतील. पुऊष एकेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या एच. एस. प्रणायॅचा पहिला सामना चीनच्या लू गुआंग झूविरुद्ध होईल. तर पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थानासाठीच्य शर्यतीत असलेल्या आणि जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर घसरलेल्या लक्ष्य सेनला सलामीच्या लढतीत जपानच्या कांटा त्सुनेयामाचे आव्हान पेलावे लागेल.
किदाम्बी श्रीकांतला देखील त्याच्या सलामीच्या सामन्यात चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनच्या रुपाने कठीण प्रतिस्पर्ध्याला सामोरे जावे लागेल, तर युवा प्रियांशू राजावतला जगातील अव्वल क्रमाकांचा खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनचा सामना करावा लागेल. ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या दोन भारतीय महिला जोड्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसेच तनिशा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांना दुर्दैवाने सुऊवातीच्या फेरीतच आमनेसामने यावे लागणार आहे.