प्रो कबड्डी लीग : हरियाणा स्टीलर्स, पुणेरी पलटण विजयी
वृत्तसंस्था /पुणे
बालेवाडीच्या श्री शिव छत्रपतीच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत सोमवारी विविध सामन्यात हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांनी अनुक्रमे गुजरात जायंटस व बंगाल वॉरियर्स यांचा पराभव केला.
सोमवारच्या हरियाणा स्टीलर्स आणि गुजरात जायंटस यांच्यातील सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघातील मनजितची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने 14 गुण नोंदवले. या सामन्याच्या सुरुवातीला चंद्रन रणजितने आपल्या चढाईवर गुजरात जायंटसला गुण मिळवून दिले. त्यानंतर मनजितने आपल्या सुपर रेडच्या जोरावर हरियाणा स्टीलर्सला आघाडीवर नेले. हरियाणा स्टीलर्सचा मनजित आणि गुजरात जायंटसचा रिंकू नरवाल यांच्या गुण मिळवण्यासाठी चुरस पहावयास मिळाली. त्यानंतर काही मिनिटातच गुजरात जायंटसचे सर्व गडी बाद झाले. मनजितने सामन्याच्या मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना सुपर टेन रेडवर हरियाणा स्टीलर्सला 21-16 अशी पाच गुणांची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या उत्तरार्धात गुजरात जायंटसने हरियाणा स्टीलर्सचे सर्व बाद करून गुणांची बढत कमी केली. महेंद्रच्या चढाईवर हरियाणाने शेवटच्या क्षणी महत्त्वाची आघाडी मिळवली. अखेर हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंटसचा 33-32 अशा केवळ एक गुणाच्या फरकाने पराभव केला.
सोमवारी सायंकाळच्या सत्रातील झालेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सचा 43-27 अशा 16 गुणांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. 2022 च्या कबड्डी हंगामामध्ये अस्लम इनामदारने 100 गुणांचा टप्पा गाठला. पुणेरी पलटनतर्फे आकाश शिंदेने 10, अस्लम इनामदारने 9 तर मोहित गोयाकने 8 गुण नोंदवले. पुणेरी पलटनने सुरुवातीच्या काही मिनिटातच बंगाल वॉरियर्सचे पहिल्यांदा सर्व गडी बाद करून आपल्या संघाला 11-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटनने दुसऱयांदा बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद केल्याने मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने 24-13 अशा गुणांची आघाडी बंगाल वॉरियर्सवर मिळवली. पुणेरी पलटनने उत्तरार्धात पुन्हा एकदा बंगाल वॉरियर्सचे तिसऱयांदा सर्व गडी बाद केल्याने त्यांनी 33-14 अशी बडत मिळवली होती. पुणेरी पलटनने हा सामना शेवटी 16 गुणांच्या फरकाने जिंकला.