प्रो कबड्डी लीग : प्ले ऑफ प्रवेशासाठी अव्वल संघांमध्ये चुरस
वृत्तसंस्था /बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत शुक्रवारी होणाऱया विविध सामन्यांमध्ये अव्वल संघात प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. या स्पर्धेत पुणेरी पलटन संघ प्लेऑफ गटाच्या समीप पोहोचला आहे.
पुणेरी पलटन संघाने 2022 च्या प्रो कबड्डी लिग हंगामात डळमळीत सुरुवात केल्यानंतर पुढील सामन्यांत जोरदार मुसंडी मारून प्ले ऑफ गटाच्या समीप पोहोचला आहे. पुणेरी पलटन संघाने या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्स संघावर विजय मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. 2019 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया बंगाल वॉरियर्स संघाला आपल्या पूर्वीच्या सामन्यात तामिळ थलैवाज संघाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागले होते. पुणेरी पलटन संघाचे प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्यांना शुक्रवारी होणाऱया सामन्यात विजय किंवा बरोबरीत (टाय) राखणे पुरेसे आहे. या स्पर्धेतील गेल्या चार सामन्यांमध्ये पुणेरी पलटनने तीन सामने जिंकले असून एक सामना टाय राखला आहे. मोहित गोयत आणि अस्लम इनामदार हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे सोमवीर आणि विशाल भारद्वाज यांच्यावर बचावफळीची मदार राहील.
शुक्रवारी होणाऱया पुणेरी पलटन आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात बंगाल संघातील मोहम्मद नबीबक्ष याची कामगिरी निर्णायक ठरू शकेल. इराणच्या नबीबक्षला या स्पर्धेत अद्याप म्हणावा तसा सूर मिळालेला नाही. मात्र, तामिळ थलैवाज संघाविरुद्ध त्याची कामगिरी दर्जेदार झाल्याने बंगाल वॉरियर्सचा संघ शुक्रवारच्या सामन्यात पुणेरी पलटनवर विजय मिळविण्यासाठी आतुरलेला आहे. शुक्रवारच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी पुणेरी पलटन संघाला नबीबक्ष आणि मनिंदरसिंग यांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. शुक्रवारी या स्पर्धेतील दुसरा सामना दबंग दिल्ली आणि तेलगू टायटन्स यांच्यात होणार आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या दोन संघात स्थान मिळविण्यासाठी दिल्लीत दबंग संघाला या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे.