प्रथमश्रेणी पदार्पणात यश धुलचे शानदार शतक
रणजी स्पर्धेच्या पहिल्या फेरीला प्रारंभ
वृत्तसंस्था /गुवाहाटी
दिल्लीचा फलंदाज व यू-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुलने गुरुवारी तामिळनाडूविरुद्ध प्रथमश्रेणी पदार्पणात शानदार शतक झळकावले. गुवाहाटीतील बरसापुरा क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या ह गटातील या लढतीत धुलने अवघ्या 150 चेंडूत 18 चौकारांसह 113 धावांचे योगदान दिल्यानंतर दिल्लीने पहिल्या दिवसअखेर 90 षटकात 7 बाद 291 धावांपर्यंत मजल मारली.
तामिळनाडूने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यश धुलने अवघ्या 133 चेंडूत 16 चौकारांसह शतक पूर्ण करत आपले प्रथमश्रेणी पदार्पण थाटात साजरे केले. वास्तविक, धुलला 97 धावांवर एम. मोहम्मदने बाद केले होते. पण, पंचांनी तो नोबॉल दिल्याने धुल सुदैवी ठरला. अगदी अलीकडेच धुलने भारताला यू-19 विश्वचषक जिंकून दिला आहे. अंतिम फेरीत भारताने इंग्लंडला धूळ चारली होती.
यंदाची रणजी चषक स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा दि. 17 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत संपन्न होईल. पुढे आयपीएल पार पडल्यानंतर दि. 30 मे ते 26 जून या कालावधीत रणजी चषक स्पर्धेतील बाद फेरीचा टप्पा होणार आहे. यंदाच्या रणजी हंगामात 62 दिवसांमध्ये एकूण 64 सामने खेळवले जातील.
अन्य लढतींवर दृष्टिक्षेप
- बडोदा सर्वबाद 181 वि. बंगाल 1 बाद 24
- हैदराबाद 88 षटकात 7 बाद 270 वि. चंदिगढ
- झारखंड सर्वबाद 169 वि. छत्तीसगड 4 बाद 135
- बिहार 3 बाद 325 वि. मिझोराम
- सिक्कीम 9 बाद 291 वि. नागालँड
- अरुणाचल प्रदेश सर्वबाद 119 वि. मणिपूर 1 बाद 95
- मेघालय सर्वबाद 148 वि. केरळ 1 बाद 205
- मध्य प्रदेश 7 बाद 235 वि. गुजरात
- कर्नाटक 5 बाद 392 वि. रेल्वे
- पुडुच्चेरी 6 बाद 309 वि. जम्मू व काश्मीर
- मुंबई 3 बाद 263 वि. सौराष्ट्र
- गोवा सर्वबाद 181 वि. ओडिशा 3 बाद 23
- राजस्थान सर्वबाद 275 वि. आंध्र 2 बाद 75
- सेनादल सर्वबाद 176 वि. उत्तराखंड 1 बाद 25
- हिमाचल प्रदेश 6 बाद 324 वि. पंजाब
- हरियाणा 4 बाद 327 वि. त्रिपुरा
- उत्तर प्रदेश 7 बाद 268 वि. विदर्भ
- महाराष्ट्र 5 बाद 278 वि. आसाम