प्रतिवृध्दी 21 व्या शतकाचा आर्थिक विचार
संपत्तीमध्ये सतत वाढ होणे म्हणजे वृध्दी. 15 व्या शतकानंतरच्या काळात सर्व जगभर वृध्दी हा सर्वसाधारण हव्यास-धर्म बनला. वृध्दी हा जादूई मंत्र झाला. सर्व भौतिक प्रश्नांवर तोडगा म्हणजे वृध्दी. विविध वाढत्या संख्येच्या वस्तू व सेवा वाढत्या लोकांना, वाढत्या प्रमाणात मिळणे असा वृध्दीचा समावेशक अर्थ होतो.
वृध्दीच्या पोटात अनेक भयानक प्रश्न दडलेले आहेत. पर्यावरणाचा ऱहास वा नाश हा त्यापैकी एक व महत्त्वाचा. कार्बन मोनोक्साईड, कार्बन डायऑक्साईड व इतर घातक वायूंचा वाढता उत्सर्ग ही मोठी समस्या आहे. पाण्याचा, जमिनीचा, हवेचा व जैवविविधतेचा वाढता विध्वंस या गोष्टीही वृध्दीबरोबर येतात.
विकसनशील राष्ट्रांना आपल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अधिक वृध्दी पाहिजे, हे जितके खरे, तितकेच हेही खरे की प्रगत / विकसित राष्ट्रांनी आता आपला उपभोग कमी करून ऊर्जा व वस्तूंचा उपयोग कमी केला पाहिजे. या विचाराचा स्वीकार करण्यातूनच पश्चिमेकडील (प्रगत) राष्ट्रातून “प्रतिवृध्दी’’ ची चळवळ उभी राहिली आहे.
त्यातूनच रिसायकलींग, जुने कपडे घेवून, नवे कपडे देणाऱया संस्था, पशुपालन ऐवजी वनस्पती पर्याय शोधणे, वाढत्या प्रमाणात शाकाहार अशा अनेक गोष्टीतून “प्रतिवृध्दी’’ प्रभाव व्यक्त होतो. प्रतिवृध्दी या संकल्पनेत एक मूलगामी / जैविक सत्य उघड होते. जबाबदारीशिवाय वृध्दी चांगली वृध्दी नाही. वृध्दीच्या पलीकडची वृध्दी-इतरांनाही वृध्दीत समाविष्ट करून घेणे, पुढच्या पिढीचा विचार करणे-व त्यासाठी प्रतिवृध्दी दृष्टीकोन स्वीकारणे आता अपरिहार्य होत चालले आहे.
प्रतिवृध्दीच्या विचारसरणीत पुढील प्रश्न उपस्थित केले जातात -
- मर्यादित साधन सामग्रीचे जग सतत वर्धमान राहू शकते कां ?
- वृध्दीमुळे वाढत्या प्रमाणात हवामान बदलाचे संकट निर्माण होते, ते कसे टाळायचे?
- 1972 च्या क्लब ऑफ राम व एमआयटी यांच्या संयुक्त प्रकाशनातून “लिमिटस् टू ग्रोथ’’ हा अहवाल आर्थिक आरिष्टाचे भविष्य सांगतो-त्याचे काय?
- वृध्दीचा “भौतिक ऱहास’’ (material footprint) - वाढत चालला आहे व परिणामी “हरितगृह’’ परिणाम व “जैवविविधता ऱहास’’ हे परिणाम दिसतात-त्यांचे नियंत्रण कसे करायचे?
- युरोपच्या सरासरी दर्जाचे जीवनमान सर्व जागतिक लोकसंख्येस देण्यास-चार पृथ्वींची नैसर्गिक साधन सामग्री कुठून आणणार?
नफ्याचा निकष दुय्यम करून आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पुनर्वापरक्षम ऊर्जा अशा क्षेत्रात अधिक गुंतवणूक झाली पाहिजे.
कोविड-19 च्या महामारीमुळे, वृध्दीच्या अतिरेकाची “फळे’’ व प्रतिवृध्दीच्या चळवळीची गरज स्पष्ट झाली आहे, असे मत गिर्गोस कॅलीस या बार्सेलोना विद्यापीठाच्या अर्थशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे. महामारीच्या समस्येतून सर्व जगभर एक सत्य उघडे झाले-आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आलो. पर्यटनातून व्यक्त होणारा अतिरिक्त उपभोग कमी करून तो रोग निवारण, प्रतिबंध व शोध यात त्या पैशाचा वापर करणे गरजेचे आहे.
प्रतिवृध्दी हा विचार मूलतः गांधीवादाशी नातं सांगतो. त्याचा साधा अर्थ-आपण प्रत्येकाने आपले जगणे अधिक साधे करून इतर अनेक दुर्दैवी लोकांचे जगणे साध्य करावे असा होतो. अति श्रीमंतांच्या अतिरेकी उपभोगामुळे गरीबांचे जगणे अधिक अवघड होते. सर्वांच्या बरोबर “बरं’’ जगणं जास्त योग्य व टिकावू, हा विचार वृध्दीच्या हव्यासामुळे दबला गेला. पण सुदैवाने तो अजूनही चैतन्यशील आहे. प्रतिवृध्दीचा विचार अवास्तव नाही. खरे तर आपण अमर्याद वृध्दी करू शकतो, हाच विचार अवास्तव आहे.
कमी वा मर्यादित उत्पादन व साधे जगणे हा आपला ध्यास असला पाहिजे. अशा साध्या जगण्यासाठी सध्याच्या ऊर्जा व साधनांच्या वापराचा छोटासाच हिस्सा गरजेचा असते. तसे झाल्यास प्रदूषणाचे प्रश्न मोठय़ा प्रमाणात सुटतात.
प्रतिवृध्दीच्या तत्त्वज्ञानाचा संबंध लिंग व्यवस्थेशी मोठय़ा प्रमाणात येतो. वृध्दीचा ठोस पाया मानवी व्यवहारांची / जीवनाची आपुलकीने काळजी घेण्याशी संबंधीत आहे. या कामाचा फार मोठा हिस्सा मेहनताना न घेता, सामाजिक मान्यतेचा विचार न करता, त्रीया करीत असतात. वस्तूतः असे जगण्याची काळजी घेण्याचे काम स्त्राr-पुरूष दोघांनी समान, समान मेहनताने करण्याची सामाजिक व्यवस्था पाहिजे.
प्रतिवृध्दीच्या संप्रदायामध्ये “नोउटो पिया’’ वर्तमानादर्श (nowtopia) असा एक विचार येतो. स्थानिक शेतकऱयाकडून अन्नधान्य प्राप्त करून अन्नपदार्थ आपसात वाटण्याची व्यवस्था करणे म्हणजे वर्तमानदर्श गाव गाडय़ाची ही पारंपारिक व्यवस्था, म.गांधींचा “खेडय़ाकडे चला’’ या आदर्शातून व्यक्त होते.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पालिटिकल सायन्स या जगमान्य संस्थेतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक मैत्रिष घटक यांच्या मते, कोविड-19 च्या महामारीने सध्याच्या वृध्दी प्रारूपाच्या कमतरता स्पष्ट केल्या आहेत. उत्पादन वाढीसाठी जसे आपण भांडवल घसारा धरतो, तसाच नैसर्गिक साधन-सामग्रीच्या वापरासाठी ही घसारा धरला पाहिजे. स्वच्छ, शुध्द ऊर्जा व प्रकाश या गोष्टींचे महत्त्व वाढत आहे. सौर ऊर्जा, वात-ऊर्जा, लाट ऊर्जा यांचा वापर वाढविण्याची गरज आहे. विद्युत वाहनांचे वाढते प्रमाण त्या दिशेचा चांगला बदल आहे.
जागतिक पातळीवर नैसर्गिक साधन सामग्रीचा वाटप राजे व गुलाम यांच्यात विषम झाला. (colonization) हा इतिहास लक्षात घेता, प्रतिवृध्दीचे तत्त्वज्ञान प्रगत राष्ट्रांना लागू करताना फेर वाटप (वैश्विक) वा मागास देशात वृध्दीचा हव्यास असा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. अर्थात त्या प्रयत्नात, पर्यावरणात्मक समतोल साधण्यावर अधिक भर सर्वांनाच ठेवावा लागेल. कामगारांकडे-श्रमशक्तीकडेही-मर्यादित सामग्री म्हणून पहावे लागेल. परस्परावंबलनाकडे दुर्लक्ष केल्यास प्रा. मैत्रिष घटक यांच्या मते, आपण फळं देणारा वृक्ष तोडण्यासारखेच आहे.
वृध्दी हा मानवी समाजाच्या सुखाचा एकमेव दर्शक होवू शकत नाही. उत्पादित संपत्तीने वितरण, वाटप अधिक समान होणे गरजेचे आहे. मानवी जीवनाच्या गुणवत्तेचे महत्त्वाचे दर्शक. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत सोई, कायदा व न्याय व नागरिकांचे हक्क यांचाही अधिक विचार झाला पाहिजे. त्या दिशेने मानव विकास निर्देशांक, भूक निर्देशांक, हरित विकास निर्देशांक इ. असे निर्देशांक अधिक महत्त्वाचे बनत आहेत. मानवी समाजाला सुसंस्कृत, समाधानाचे भवितव्य असावे, असे वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे.
प्रा.डॉ.जे.एफ.पाटील