पुतिनविरोधी नेत्याचा रशियात कारागृहात मृत्यू
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे अॅलेक्सी नेव्हलनी यांचा कारागृहात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला रशियाच्या प्रशासनाने दुजोरा दिला असून चौकशी करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. मात्र, ही चौकशी केवळ औपचारिकच असेल असे तज्ञांचे मत आहे.
त्यांच्या मृत्यूचे वृत्त रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना कळविण्यात आले आहे. त्यांनी त्वरित कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. रशियाच्या प्रशासनानेही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारणही समोर आलेले नाही. मात्र, त्यांचा मृत्यू कारागृहात झाला असल्याने अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाश्चिमात्य जगही या मृत्यूकडे संशयाने पहात आहे.
तरुण वयापासूनच पुतीनविरोधी
पुतीन यांना विरोध करण्याचे काम त्यांनी त्यांच्या तरुण वयापासूनच हाती घेतले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांनी पुतीन हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोधात कारवाई सुरु केली होती. तरीही त्यांनी पुतीनविरोध सोडला नव्हता.
कोण होते नेव्हलनी
अॅलेक्सी नेव्हलनी हे 47 वर्षांचे होते. ते व्यवसायाने विधीज्ञ होते. एका दशकापूर्वी ते एकदम प्रकाशात आले होते. त्या काळात त्यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार, उच्चपदस्थांचे कथित काळे व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवस्थापन यांच्या विरोधात जोरदार आवाज उठविला होता. त्यांना पाश्चिमात्य देशांनीही मोठ्या प्रमाणात उचलून धरले होते. त्यांनी पुतीन विरोधात कठोर भूमिका घेतली होती. रशियाच्या प्रशासनाने त्यांना कारागृहात डांबले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला होता. नंतरच्या काळात त्यांची शिक्षा 19 वर्षांपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यांना उत्तरध्रूवानजीच्या अतिथंड प्रदेशातील कारागृहात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरुन आल्यानंतर अचानक बेशुद्ध पडले. बेशुद्धावस्थेतच त्यांचा मृत्यू झाला, असे नंतर घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला असून खऱ्या चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांना कारागृहात डांबण्याआधी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचाही आरोप होता.