पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध करणारे सावरकर हे पहिले भारतीय
प्रतिनिधी/ पणजी
इतिहासाच्या नावाखाली भारतावर लादू पाहणाऱया पाश्चिमात्य संस्कृतीला आव्हान देणारे व त्यास विरोध दर्शवणारे वीर सावरकर हे पहिले भारतीय होते असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुमांव साहित्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले.
नामवंत इतिहास लेखक विक्रम संपथ यांच्या ‘विनायक दामोदर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दुर्दैवाने पाश्चिमात्य लोकांनी चुकीचा इतिहास आपल्या देशावर लादला त्याला सडेतोड उत्तर देण्याचे काम सावरकरांनी केले. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि जागृती करुन सत्य जनतेसमोर ठेवले.
लेखक संपथ म्हणाले की, लंडन, पॅरीस, बर्लिन व इतर अनेक ठिकाणी जाऊन पुस्तकासाठी माहिती संकलित केली आहे. शिवाय अनेक दस्ताऐवज वाचून (विविध भाषेतील) हे पुस्तक लिहिले आहे. सावरकर हे देशभक्तीने प्रेरीत झालेले भारतमातेचे सुपुत्र होते, असेही संपथ यांनी नमूद केले. त्यांना 14 वर्षाची शिक्षा झाली होती आणि ते खरेखुरे स्वातंत्र्यसैनिक होते असे संपथ यांनी सांगितले. सावरकर हे मोठे विचारवंत होते, असेही ते म्हणाले.
संपथ यांच्या पुस्तक प्रकाशनाने दोन दिवसीय कुमांव साहित्य महोत्सवाचा समारोप झाला. अनेक चर्चासत्रे, परिसंवाद होऊन त्यांत विविध वक्त्यांनी भाग घेतला आणि विचार मांडले.