पाकिस्तानात सांप्रदायिक हिंसा, 47 ठार
शिया मुस्लीम उतरले रस्त्यांवर : सामूहिक हत्येचा घेतला सूड
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम येथील बागन बाजारमध्ये शिया आणि सुन्नी मुस्लिमांदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आहे. शिया मुस्लिमांनी सुन्नीबहुल भागांमध्ये शस्त्रास्त्रांसह हल्ला केला आहे. शिया मुस्लिमांनी सुन्नी मुस्लिमांची घरे पेटवून देत अनेकांना ठार केले आहे. मागील दोन दिवसांच्या हिंसेत आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर शिया मुस्लिमांनी पाकिस्तानचा विशाल ध्वज उतरवून त्याजागी स्वत:चा ध्वज फडकविला आहे. तर सांप्रदायिक हिंसा पाहता पूर्ण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पाकिस्तानी प्रशासनाने हिंसा रोखण्यासाठी तेथील मोबाईल सेवाही रोखली आहे. पैराचिनार भागात सर्व व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा पूर्ण भाग अफगाणिस्तानच्या सीमेनजीक असून तेथे यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर शिया-सुन्नी मुस्लिमांदरम्यान हिंसा झाली आहे. शुक्रवारी हजारोंच्या संख्येत शिया मुस्लीम शहरांच्या रस्त्यांवर उतरले होते. तर त्यापूर्वी 200 वाहनांच्या ताफ्यासह शिया मुस्लीम हे पेशावर येथून पैराचिनार येथे जात असताना सुन्नी मुस्लिमांच्या सशस्त्र गटांनी हल्ला केला होता.
सुन्नी मुस्लिमांच्या गटाने केलेल्या गोळीबारात मोठी जीवितहानी झाली होती. 50 पेक्षा अधिक शिया मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर शिया मुस्लिमांचे गट भडकले आहेत. पोलीस वाहन ताफ्याला सुरक्षा पुरविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप शिया मुस्लिमांनी केला आहे.