कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानची शोकांतिका

06:30 AM Apr 01, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्या (दुर्दैवाने) शेजारी असणाऱया पाकिस्तान या देशात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. तेथील पंतप्रधान इम्रानखान यांचे आसन जाण्याच्या बेतात आहे. तसे पाकिस्तान आणि राजकीय अस्थिरता यांचे नाते अगदी जवळचे. त्या देशाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंतच्या 75 वर्षांच्या इतिहासात तेथे एकाही सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. तेथील नागरी सरकार लष्कराच्या आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या आधीन असते. या दोन शक्तींची मर्जी सांभाळत, तसेच त्यांच्या दयेवर त्याला जगावे लागते. इम्रानखान यांच्यावर तर या लष्कराचे साहाय्य घेऊनच चार वर्षांपूर्वी तेथील सार्वत्रिक निवडणूक जिंकल्याचा आरोप केला जातो. तो खरा असण्याची शक्यता अधिक. त्यामुळे इम्रानखान यांच्या पंतप्रधान म्हणून कार्यकालाचा प्रारंभच मुळात लष्कराच्या खांद्यावर डोके ठेवून झालेला होता. खांद्यावरुन हे डोके केव्हाना केव्हा लष्कराच्या पायाखाली जाणार हे देखील ठरलेलेच होते. ती वेळ आता आली आहे, असे दिसते. तेथील सर्व विरोधी पक्ष आता खान यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला असून त्यावर गुरुवारपासूनच चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या राष्टीय संसदेत बहुमतासाठी 172 जागांची आवश्यकता असते. इम्रानखान यांना पाठिंबा देणाऱया सर्व पक्षांनी आता विरोधकांशी हातमिळवणी केल्याने विरोधकांच्या जागा 177, अर्थात बहुमतापेक्षा अधिक झाल्या असल्याने इम्रान सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट होते. तरीही अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याच्या वेळी ते काहीतरी चमत्कार घडवितील अशी आशा त्यांच्या समर्थकांना अद्यापही वाटते. अजून अविश्वास प्रस्तावावर मतदान झालेले नाही. त्यामुळे नेमके काय होणार हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी, इम्रान सरकार वाचण्याची शक्यता अंधुक असल्याचे तेथील तज्ञही स्पष्टपणे सांगतात. इम्रान सरकारचा पाडाव झालाच, तर त्याला ते स्वतःच कारणीभूत असतील, असे निश्चितपणे म्हणता येते. कारण गेल्या चार वर्षांमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या कल्याणासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी भारताचा दुस्वास करण्यात  आणि भारतविरोधी भावना पोसण्यात घालविला. अर्थात, त्यांनी यात काही वेगळे केले असे नाही. पाकिस्तानच्या प्रत्येकच सरकारने आजवर आपले आणि आपल्या देशाचे अस्तित्व भारतद्वेषावर टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पंतप्रधानानांनी भारताशी जुळवून घेऊन सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यांची गचांडी धरुन त्यांना पायउतार करण्यात आले. तसेच ज्या पंतप्रधानांना भारतासमोर मान खाली घालावी लागली, त्यांचा तर पदावरुन गेल्यानंतरही एकतर अपमान करण्यात आला किंवा काटा काढण्यात आला. झुल्फीकार अली भुत्तो यांनी एकेकाळी भारताविरोधात हजार वर्षे संघर्ष करण्याची उद्दाम आणि अतिरंजित भाषा केली होती. पण प्रत्यक्ष युद्ध झाले तेव्हा पाकिस्तानचे सैन्य भारतासमोर 15 दिवसही टिकू शकले नाही. या पराभवाचा राग भुत्तोंवर उतरविण्यात आला आणि त्यानंतरचे लष्करशहा झिया उल हक यांनी भुत्तो यांना फासावर लटकविले. कारगिल युद्धात पाकिस्तानची अशीच मानहानी झाली. तेव्हा तो राग तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर काढण्यात आला. त्यांच्यानंतर सत्ता बळकाविलेले लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांची रवानगी कारागृहात केली. आंतरराष्ट्रीय दबावामुळे शरीफ यांचे प्राण वाचले आणि ते नंतर पुन्हा पंतप्रधान होऊ शकले. एकंदरीत पाहता, पाकिस्तानात लष्कराची लहर सरकारविरोधात केव्हाही फिरु शकते आणि सरकारचा जीव जाऊ शकतो. आता इम्रानखान यांना हाच अनुभव येत आहे. 2015 मध्ये उरी येथे भारताच्या सेनातळावर दहशतवादी हल्ला चढविण्यात आला होता. नंतर बालाकोट येथे 2019 मध्ये भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या बसवर पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 40 भारतीय सैनिकांना प्राण गमवावे लागले. पण असे काही घडविले तरी, भारत सरकार फारतर निषेधाचे खालीते काढते आणि उगाच संघर्ष वाढू दे नको म्हणून स्वस्थ बसते, असा पाकिस्तानचा अनुभव होता. 2008 मध्ये मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून नरसंहार घडविला, त्यानंतरही भारताने सामरिक प्रत्युत्तर दिले नव्हते, हा इतिहासही ताजा होताच. पण पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पाकिस्तानला या दोन्ही वेळी वेगळय़ा औषधाची चव दाखविली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीरात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करतानाच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा आपल्या सैनिकांनी केला. बालाकोटनंतर पाकवर एअरस्ट्राईक करण्यात आला. कदाचित याचीच किंमत इम्रानखान यांना भुत्तो आणि शरीफ यांच्याप्रमाणे भोगावी लागत असावी. यावेळी तेथील लष्कराने त्रयस्थाची भूमिका वरकरणी तरी स्वीकारली आहे. तसेच इम्रानखान यांनी ‘परकीय हाता’चे कारण पुढे केले आहे. तथापि, संकटाचे खरे कारण इम्रान यांना भारतावर कुरघोडी करण्यात आलेले अपयश हे असू शकते. इम्रान यांची हकालपट्टी झालीच, तर जो नवा पंतप्रधान होईल त्याच्याकडूनही भारताला फारशी सकारात्मक अपेक्षा बाळगता येणे कठीणच. कारण तोही लष्कराच्या बोळय़ानेच दूध पिणारा असणार हे निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानातील उलथापालथींमुळे भारताने हुरळून जाण्याचेही कारण नाही आणि बेसावधपणा तर मुळीच दाखविता कामा नये. कारण, भारताचा विद्वेष आणि भारतासंबंधी असूया हेच ज्या देशाच्या अस्तित्वाचे अधिष्ठान आहे, तेथे कोणतेही सरकार आले किंवा गेले तरी काही सकारात्मक परिवर्तन होण्याची शक्यता नाही. काहीजणांच्या मते पाकिस्तानमधील अस्थिरतेचे कारण त्या देशाने युक्रेन युद्धात घेतलेली रशियाच्या बाजूने झुकणारी भूमिका हे आहे. तथापि, ते फारसे खरे असेल असे वाटत नाही. कारण पाकमध्ये कोणतेही सरकार आले आणि त्याचे या युद्धासंबंधी कोणतेही धोरण असले, तरी महासत्तांच्या संघर्षात ठोस भूमिका घेण्याचे सामर्थ्य पाकिस्तानमध्ये नसल्याने या युद्धात त्याचे महत्व नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article