पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका, दिग्गज नेत्याने सोडला पक्ष
वृत्तसंस्था/ कोलकाता
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेत कौस्तव बागची यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षात योग्य सन्मान न मिळाल्याने राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्वत:चा राजीनामा त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि महासचिव गुलाम अहमद मीर यांना पाठविला आहे.
भ्रष्ट तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करण्यास माझा विरोध आहे. काँग्रेसचे नेतृत्व पश्चिम बंगालमधील पक्षसंघटनेला कुठलेच महत्त्व देत नाही. याचमुळे मी स्वत:च्या स्वाभिमानाशी तडजोड करू इच्छित नसल्याचे बागची यांनी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी भाजपप्रवेशाचे संकेत दिले आहेत.
एक किंवा दोन दिवसांत माझ्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट होणार आहे. सध्या केवळ भाजप नेते शुभेंदु अधिकारी हेच बंगालमधून तृणमूल काँग्रेस सरकारला हटवू शकतात असे वक्तव्य बागची यांनी केले आहे.
बागची यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मागील वर्षी मार्च महिन्यात जामिनावर सुटका झाल्यावर बागची यांनी निषेधार्थ मुंडन करवून घेतले होते. राज्यात ममता बॅनर्जी सरकार असेपर्यंत कपाळावर केस न वाढविण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती.