पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन
पूर्णियामधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या सीमांचलमध्ये प्रभाव असलेले राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी आपल्या ‘जन अधिकार पक्षा’चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. आता पप्पू यादव हे लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णियामधून महाआघाडीचे उमेदवार असतील असे मानले जात आहे. आपल्या उमेदवारीसाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
काँग्रेसने पूर्णियातून लोकसभेचे तिकीट दिल्यास ते पक्षात विलीन होतील, असे संकेत पप्पू यादव यांनी दिले होते. पप्पू यादव यांच्या पत्नी रंजिता रंजन या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. काँग्रेसने त्यांना छत्तीसगडमधून राज्यसभेवर पाठवले होते. पप्पू यादव यांच्या पक्षाचा बिहारमध्ये सध्या एकही आमदार किंवा खासदार नाही. मात्र, यापूर्वी ते स्वत: खासदार राहिलेले आहेत. त्यांनी 2019 मध्ये मधेपुरामधून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण ते पराभूत झाले होते. आता त्यांनी 2024 मध्ये पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 1990 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले पप्पू यादव यांनी 1991, 1996, 1999, 2004 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
लालू-तेजस्वींशी चर्चा
माजी खासदार पप्पू यादव यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात भेट घेतली. त्यानंतर बुधवारी पप्पू यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरजेडी सुप्रीमो आणि तेजस्वी यादव यांचे कौतुक केले होते. तसेच आपण दीर्घकाळापासून काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करत असल्याचे निश्चितपणे सांगितले होते. त्यानंतर पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी अटकळ मानली जात होती.
अजित सरकार खून प्रकरणात नाव
माकपचे आमदार अजित सरकार यांची 14 जून 1998 रोजी हत्या झाली होती. हत्येत एके-47 चा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात पप्पू यादव यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते. याशिवाय राजन तिवारी, अनिल यादव, अमर यादव, हरीश चौधरी आदींना आरोपी करण्यात आले. पाटणाच्या खासदार-आमदार न्यायालयाने 2008 साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण, 17 मे 2013 रोजी पाटणा उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी पप्पू यादव यांच्यासह राजन आणि अनिल यांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर पप्पू यादव यांनी 2015 मध्ये जन अधिकार पक्षाची स्थापना केली. त्यांच्या पक्षाने बिहार विधानसभेचे उमेदवार उभे केले होते पण त्यांना यश आले नाही.